धक्कादायक! एआयमुळे नोकऱ्या धोक्यात, ‘ही’ बँक 4 हजार जणांना कामावरून काढणार

DBS Bank | सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर वाढला आहे. मात्र, एआयचा वाढता वापर कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत चालला आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या यामुळे धोक्यात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या डीबीएस बँकेनेही आता जवळपास 4 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंगापूरमधील प्रमुख बँक असलेला DBS ग्रुप पुढील 3 वर्षात एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. जवळपास 4 हजार कर्मचाऱ्यांना यामुळे नोकरी गमवावी लागणार आहे. एआयचा वापर अधिक प्रमाणात केला जात असल्याने हा निर्णय घेण्यता आल्याची माहिती त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष गुप्ता यांनी दिली.
एका कार्यक्रमात बोलताना गुप्ता म्हणाले की, आतापर्यंतच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत एआय हे पूर्णपणे वेगळे आहे. 15 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे.
गुप्ता म्हणाले की, माझा अंदाज आहे की पुढील 3 वर्षांत आमची कर्मचारी संख्या 4 हजारानेने किंवा 10 टक्क्यांनी कमी होईल. यावेळी बोलताना एआय हे खूपच शक्तिशाली असल्याचे ते म्हणाले.
DBS ग्रुपमध्ये सध्या 41 हजार कर्मचारी कार्यरत आहे. मागील 10 वर्षात बँकेकडून कोणतीही नोकरकपात करण्यात आलेली नाही. मात्र, आता डीबीएस बँकेकडून एआयच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात आहे. तसेच, बँकेने स्पष्ट केले की, ही कपात प्रामुख्याने कंत्राटी व तात्पुरत्या कामगारांशी संबंधित असेल.





