पुणे जिल्हा | बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा वीजपुरवठा

शिरुर, (वार्ताहर)- शिरूर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांसह अनेक मनुष्यांवर हल्ला करून ठार केले होते. शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज मिळावी. यासाठी अनेकवेळा अधिवेशनात आवाज उठवला होता.
आता बिबट प्रवण क्षेत्रामध्ये शेतकरी व नागरिकांना दिवसा वीज मिळणार आहे. निमोणे येथून याची सुरुवात केल्याची माहिती शिरूर- हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी शिरूर येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
शिरुर शहराचा विविध विकासकामांद्वारे झपाटयाने कायापालट करणार असल्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पवार म्हणाले की, शिरूर शहरात टेरेसवर वीजवाहक तारेला हात लागून मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. महावितरणच्या जुन्या वीज वाहक तारा बदलून त्याजागी बंच केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे.
त्यामुळे यापुढील काळात नागरिकांना घराजवळून, टेरेसवरून जाणाऱ्या वीज वाहक तारांपासून कुठलाही धोका होणार नाही. निर्वी व चिंचणी असे दोन नवीन फिडर कार्यान्वित केले असून त्या भागात दिवसा वीज देण्यास कुठली अडचण येणार नाही. वडगाव रायसाई येथे फीडरला एअर बंद केबल टाकण्याचे काम सुरू झाले आहे.
यावेळी शिरूर महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुमीत जाधव उपस्थित होते. शिक्रापूर येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडून कामांची माहीती घेतली.
पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडीमधील धोकादायक स्पीड बेकर हटवण्याची नागरीकांची मागणी होती. स्पीड बेकरमुळे रोज अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे मोठया स्पीड बेकरऐवजी झिक झॅक स्पिड बेकर २ दिवसांत टाकण्याच्या सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
अधिवेशनात निर्णय
पवार म्हणाले की, शिरूर तालुक्यातील अनेक भाग बिबट प्रमाण क्षेत्रात येत आहेत. या भागात बिबट्याचे प्रमाण जास्त असल्याने रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देत असताना तसेच अनेक वेळा रात्री प्रवास करणाऱ्या मोटर सायकलस्वारांवरही बिबट्याने जीवघेणे हल्ले केले आहेत. शेतीला दिवसा पाणी देता यावे, यासाठी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. यंदाचा अधिवेशनात दिवसा वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यापुढील काळात दिवसा वीज राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ल्युमिनियमची तार वापरावी
शिरुर तालुक्यात विद्युत रोहित्राच्या वारंवार चोऱ्या वाढल्यामुळे ११ केव्हीचे वित्युत रोहित्र बसवण्याची सरकाकडे मागणी केली आहे. रोहित्रामध्ये तांब्याच्या तारेऐवजी ॲल्युमिनियमची तार वापरावी,
अशा सूचना दिल्या आहेत. याची सुरुवात निमोणे येथून झाली आहे. रोहित्र चोरी करून त्याच्या तारा जो व्यावसायिक घेत असेल त्याच्यावरही गंभीर गुन्हा दाखल करावा, अशा सूचना महावितरण व पोलीस आधिकाऱ्यांना दिल्या आहेत.





