Dayanidhi Maran : नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करा; खासदार दयानिधी मारन यांची मागणी
लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकार प्रतिबंधक) दुरुस्ती विधेयक, २०२६ वरील चर्चेदरम्यान द्रविड मुन्नेत्र कझगमचे खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली.

Dayanidhi Maran : लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकार प्रतिबंधक) दुरुस्ती विधेयक, २०२६ वरील चर्चेदरम्यान द्रविड मुन्नेत्र कझगमचे खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली. सरकारने आणलेले नवीन दुरुस्ती विधेयक मूळ समस्येचे निवारण करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
आता पुरे झाले, नीटवर बंदी घाला. एक देश, एक परीक्षा धोरण थांबवा, असे म्हणत मारन (Dayanidhi Maran) यांनी भारताच्या विविधतेचा आदर करण्याचे आवाहन केले. नीट परीक्षेचा आराखडा पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि राज्य शिक्षण मंडळांच्या विरोधात असून, यामुळे केवळ खाजगी कोचिंग सेंटर्सचा फायदा होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नीटमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे तमिळनाडूमध्ये आतापर्यंत २६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच दरवर्षी २२ लाख विद्यार्थी परीक्षा देतात पण केवळ १.३९ लाख जागा उपलब्ध असतात, ज्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण येतो, असे ते म्हणाले. हे विधेयक म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी असून, त्यामुळे मूळ दोष असलेल्या परीक्षेची रचना बदलत नाही.
पंतप्रधानांची एक फेसबुक पोस्ट हटवल्यानंतर सरकारने मेटा प्रमुखांना स्पष्टीकरणासाठी बोलावले, परंतु विरोधी खासदारांच्या व्हॉट्सॲप मेसेजवर निर्बंध लादले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांचे रेकॉर्डिंग करण्यासाठी मेटा स्मार्ट ग्लासेसचा वापर केला जात असल्याचा दावाही त्यांनी (Dayanidhi Maran) केला.






