Champions Trophy 2025 : ‘ते योग्य नव्हते…’, उपांत्य सामन्यातील पराभवानंतर डेव्हिड मिलरने आयसीसीवर व्यक्त केली नाराजी

David Miller upset on ICC for Champions Trophy 2025 Schedule : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना ९ मार्च रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताशी होणार आहे. लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात डेव्हिड मिलरने शतकी खेळी साकारली. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊन शकला नाही. उपांत्य सामन्यातून बाहेर पडल्यानंतर डेव्हिड मिलरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावरून आयसीसीवर टीका केली आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी आफ्रिकन संघाला दुबईला जावे लागले आणि नंतर लाहोरला परत यावे लागले. याबद्दल डेव्हिड मिलरने नाराजी व्यक्त केली. कारण भारताव्यतिरिक्त इतर संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक खूपच विचित्र होते. गट फेरीतील सामने संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या उपांत्य सामन्यासाठी पाकिस्तानहून दुबईला जावे लागले. कारण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लीग टप्प्यातील अंतिम सामना अजून खेळला गेला नव्हता. या सामन्याच्या निकालावरून गटात अव्वल स्थान मिळवून कोणता संघ पात्र ठरेल हे निश्चित होणार होते. त्यामुळे भारतासोबतच्या संभाव्य सामन्यामुळे दोन्ही संघांना दुबईला जावे लागले.
डेव्हिड मिलरने आयसीसीवर व्यक्त केली नाराजी –
डेव्हिड मिलर म्हणाला, “ही एक तास ४० मिनिटांची फ्लाइट होती पण आम्हाला तो प्रवास करावा लागला, जे योग्य नव्हते. सकाळची वेळ होती, सामना संपल्यानंतर आम्हाला प्रवास करायचा होता. मग आम्ही दुपारी ४ वाजता दुबईला पोहोचलो आणि त्यानंतर पुन्हा सकाळी ७:३० वाजता परत आलो. आम्ही पाच तास प्रवास केला. परंतु आम्हाला आरामासाठी पुरेसा वेळ मिळाला असे नाही, पण तरीही ती आदर्श परिस्थिती नव्हती.”
भारताने शेवटच्या गट सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला, ज्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला उपांत्य सामना झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी पाकिस्तानमध्ये परतावे लागले. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आणि म्हणूनच आयसीसीने भारताचे सर्व सामने दुबईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला.





