प्रभात वृत्तसेवा यवत – यवत (ता. दौंड) येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे हे गायब झाले होते. ते (दि.१०) रात्री उशिरा आपल्या घरी परतले. यावर अखेर पडदा पडला. मात्र, आंबेडकरी चळवळीचे नेते पंकज धिवार यांनी पत्र देत आंदोलनाची हाक दिली. तत्पूर्वीच रणदिवे घरी आले असल्याची माहिती समोर आली. मात्र यामध्ये कितपर्यंत सत्यता होती हे यवत पोलिसांना देखील सांगता येत नसल्याने दिलेल्या वेळेत आंदोलन सपन्न झाले. यावेळी मान्यवर यांनी पोलीस प्रशासनावर आणि नारायण देशमुख यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या कामाबद्दल निषेध व्यक्त करीत त्यांच्याविरोधात घणाघाती भाषणे केली. ही घटना पोलीस प्रशासनास व लोकशाहीला काळिमा असणारी घटना आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. अरुण जाधव यांनी यावेळी केले.जाधव म्हणाले, पोलीस अधिकारी हे पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याचे विरुद्ध वागत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांचा इतका छळ तर हे अधिकारी सामान्य नागरिकांना कशी वागणूक देत असतील. देशमुख यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा; अन्यथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.आंदोलनकर्ते रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश डाळिंबे, यावेळी माजी उपसभापती विकास कदम यांनी पोलीस प्रशासनावर टीकास्त्र सोडले. पुरंदर रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार म्हणाले, देशमुख यांनी रणदिवे यांचेसह अनेक पोलीस कर्मचारी आणि महिला कर्मचारी यांचा छळ केलेला आहे. ते सर्व जण तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत आहेत. देशमुख आणि दडस यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत; अन्यथा याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल.यावेळी दत्ता डाडर, दत्तू लोंढे, डॉ.अशोक फडतरे, उत्तम सोनवणे, सुहास बनसोडे, निलेश शेंडे, अनिल कांबळे, सारिका भुजबळ यांची देशमुख आणि दडस यांच्याविरोधात घणाघाती भाषणे झाली. रणदिवे घरी परतूनही आंदोलनाची हाक निखिल रणदिवे हे रात्री उशिरा घरी परतले. मात्र, पंकज धिवार यांनी आंदोलनाची हाक दिल्याने असंख्य भीम कार्यकर्ते आणि संविधान प्रेमी या आंदोलनाला उपस्थित राहिले. यावेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील वांगडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांनी सत्यता पडताळून घेतली. आंदोलकांना त्यांनी लेखी स्वरूपात पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.