Daund News : वर्गात शुकशुकाट पण हजेरीपटावर गर्दी! दौंड-शिरूरमधील शाळांचा ‘बोगस’ कारभार उघड?
Daund News : सरकारी अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या; दौंड आणि शिरूर तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.

Daund News – ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. प्रत्यक्षात वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असतानाही हजेरीपटावर मात्र पूर्ण उपस्थिती दाखवली जात असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. सरकारी अनुदान, विविध योजना तसेच शिक्षकांची पदे कायम ठेवण्यासाठी काही शाळांकडून कागदोपत्री विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दाखवली जात असल्याचा आरोप पालक आणि शिक्षणप्रेमींनी केला आहे.
अनेक विद्यार्थी शाळेच्या वेळेत खासगी क्लासला जात असताना शाळेत मात्र त्यांची उपस्थिती दाखवली जाते, असेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे काही शाळांमधून खासगी क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ठराविक रक्कम घेऊन कागदोपत्री प्रवेश दिला जात असल्याचीही चर्चा आहे. या शाळांचे बहुतांश व्यवस्थापक राजकीय पार्श्वभूमीचे असल्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जात आहे.
याशिवाय प्रवेश फी व्यतिरिक्त शाळेचा युनिफॉर्म, परीक्षा फी आदींचे पैसे बिगर पावती घेतले जात असल्याचेही पालक सांगत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय जास्त गुण मिळवून देण्यासाठी वेगळी रक्कम आकारली जात असल्याची चर्चा असून अन्यथा कमी गुण मिळाल्यास तक्रार करू नये अशी भीतीही दाखवली जाते.
दौंड व शिरूर तालुक्यातील काही शाळांमध्ये असे प्रकार घडत असल्याची चर्चा असून या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
* कागदावर विद्यार्थी, वर्गात रिकामे बाक
* खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना ठराविक रक्कम घेऊन प्रवेश
* प्रवेश फी, युनिफॉर्म व परीक्षा फी बिगर पावती
* वर्षभर शाळेत न जाता ही निरोप समारंभ फी द्यावीच लागते
* शालेय गुणांसाठी वेगळी रक्कम आकारल्याची चर्चा
* दौंड व शिरूर तालुक्यातील काही शाळांबाबत संशय





