शिरूर :शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ढाकी वस्ती परिसरात रविवारी (दि. १४ डिसेंबर) सायंकाळी गाईचा पाठलाग करताना एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. मात्र विहिरीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने आणि वीजपंपाच्या पाईपच्या साहाय्याने बिबट्याने विहीरीतून वर येत शिताफीने पलायन केले. ढाकी वस्तीवरील सोपान मुखेकर यांच्या मालकीच्या विहिरीत हा प्रकार घडला. सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास गाई चरत असताना बिबट्याने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा करून त्याला पिटाळल्यावर तो पळत जाऊन मुखेकर यांच्या विहिरीत पडला. विहिरीत पडल्यावर बराच वेळ बिबट्या पाण्यातील वीजपंपाच्या पाईपला पकडून राहिला. पाण्याची पातळी वर असल्याने त्याने पाईपच्या साहाय्याने सुमारे आठ फूट उडी मारत बाहेर येऊन जंगलाच्या दिशेने पलायन केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. शिरूर तालुक्यात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असून शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी हौशीराम मुखेकर, मनोज मुखेकर, सागर मुखेकर, नितीन मुखेकर, मोहन मुखेकर आणि राजेंद्र मुखेकर यांनी केली आहे.1