Daund News: दौंडच्या शेतकऱ्यांचा एल्गार! उसाला ५ हजार रुपये दर द्या; ऊस उत्पादक आक्रमक
Daund News: साखर अन् गुळाचे बाजारभाव गगनाला भिडले; उत्पादनातील वाढलेल्या हिश्श्यासाठी दौंडच्या शेतकऱ्यांची एकजूट.

Daund News – साखर आणि गुळाच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याने आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. सध्या साखरेचा किरकोळ बाजारभाव ७० रुपये किलो, तर गुळाचा बाजारभाव ६० ते ६५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे साखर आणि गुळाच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळावा, अशी मागणी दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
साखरेचा दर वाढल्याने पर्यायाने गुळाचेही बाजारभाव वाढले आहेत. दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुऱ्हाळे सुरू आहेत. अनेक ठिकाणी ऊस गाळपाचा हंगाम सुरू आहे. सध्या गुऱ्हाळांकडून उसाला सरासरी ३७०० ते ३८०० रुपये प्रतिटन दर दिला जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे गुळाच्या बाजारभावात झालेली वाढ पाहता उसाच्या दरामध्येही त्याच प्रमाणात वाढ होण्याची गरज आहे.
गुळाचे दर वाढले, मग उसाचा का नाही?
गेल्या काळात गुळाच्या उत्पादनातील खर्च, बाजारातील चढ-उतार, गुळामध्ये साखर न वापरण्याच्या अटींचा आधार घेत काही गुऱ्हाळ चालकांनी उसाच्या दरात कपात केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन कमी दर स्वीकारला. मात्र, आता गुळाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या बाजारभावाचा फायदा केवळ गुऱ्हाळचालकांना न होता, राबणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणे गरजेचे आहे.
उत्पादन खर्चाने खिसा रिकामा
ऊस पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना वर्षभर पाणी, खते, औषधे, मजुरी, मशागत, तोडणी, वाहतूक आदींसाठी मोठा खर्च करावा लागतो. उन्हाळा, पावसाळा, बदलत्या हवामानाचा सामना करीत शेतकरी ऊस वाढवतो. मात्र, उत्पादन हातात आल्यानंतर बाजारभावाच्या बाबतीत शेतकऱ्याच्याच वाट्याला कमी दर येत आहे, ही स्थिती अन्यायकारक असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.
३७०० रुपयांवर समाधान का?
साखर, गुळाच्या दरात वाढ होताना उसाला केवळ ३७०० रुपये प्रतिटन दर देऊन शेतकऱ्यांनी समाधान मानावे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. बाजारातील तयार मालाच्या किमती वाढत असतील, तर त्या वाढीचा योग्य हिस्सा कच्चा माल निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याला मिळणे आवश्यक आहे. गुळाला चांगला दर मिळत असेल तर उसालाही चांगला दर मिळालाच पाहिजे, अशी भूमिका उत्पादकांनी घेतली आहे. सध्याच्या बाजारपेठेनुसार उसाला किमान ५००० रुपये प्रतिटन दर मिळावा, अशी मागणी होत आहे.






