Daund News : वीजदरवाढ रद्द करा! दौंडकरांचा महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

प्रभात वृत्तसेवा
दौंड – दौंड शहरातील वीजदरवाढ आणि सुरक्षा डिपॉझिट रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. ६) वीज वितरण महामंडळ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आदी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.या आंदोलनादरम्यान वीजबिल पेटवून महाराष्ट्र शासन व महावितरण कंपनीविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.
‘वीजदरवाढ रद्द करा’ आणि ‘सुरक्षा डिपॉझिट माफ करा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात काँग्रेसचे हरिष ओझा, शिवसेनेचे आनंद पळसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन गायकवाड, शिवसेनेचे अनिल सोनवणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी महावितरणच्या धोरणांवर तीव्र टीका केली. यावेळी महावितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात, वीजदरवाढ आणि सुरक्षा डिपॉझिटची अंमलबजावणी ही सर्वसामान्य जनतेवरील अन्याय आहे. सरकार आणि महावितरणने तत्काळ ही दरवाढ आणि डिपॉझिट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.





