Daund News – पारगाव (ता. दौंड) येथे शेतात ऊसाची तोडणी झाल्यावर शेतात पाचट पेटविताना उष्णतेच्या भडक्याने पोळल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. २२ रोजी दुपारी घडली. जालिंदर रामचंद्र भाडळे असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जालिंदर भाडळे हे आपल्या शेतातील उसाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट पेटवण्यासाठी दुपारच्या सुमारास शेतात गेले होते. दु. २ वाजता उसाचे पाचट पेटवल्यानंतर उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आणि पेटलेल्या पाचटाची दाहकता या दोन्हींमुळे ते चक्कर येऊन पडले. त्यात त्यांच्या मानेला, पायाला व दोन्ही हातांना भाजले होते. शेजारच्या शेतात काम करणाऱ्या महिलांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांना फोनद्वारे कळविले. कुटुंबीयांनी त्यांना दवाखान्यात नेले. परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी कथन केली. शवविच्छेदनासाठी त्यांचे पार्थिव यवत येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले होते. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. परंतु उन्हाची असणारी तीव्रता आणि आगीची दाहकता यामुळे चक्कर येऊन आगीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अतुल राऊत हे करीत असल्याचे यवत पोलीस स्टेशनच्या वतीने सांगण्यात आले.