Daund Crime: चिमुकलीचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला! दौंड तालुक्यातील नानगाव येथील धक्कादायक घटना
Daund Crime: आईसोबत झालेल्या वादाचा सूड बालकावर; आरोपी पीडित चिमुकलीला घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती.

Daund Crime – दौंड तालुक्यातील नानगाव येथे ऊसतोड मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली. मुलीच्या आईसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी गोरख मानसिंग वसावे (वय ३०, रा. राणीपूर, जि. नंदुरबार) याला अटक केली आहे. घटनेच्या वेळी आरोपी चिमुकलीला घेऊन फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबीय आणि आरोपी हे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील असून ऊसतोड मजुरीसाठी नानगाव परिसरात आले होते.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस व यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. विहिरीत पाणी अधिक असल्याने पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी चिमुकलीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
वैद्यकीय शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर या प्रकरणातील अधिक बाबी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली. या वेळी नानगावचे पोलीस पाटील पोपट लव्हे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्दैवी व सुन्न करणाऱ्या घटनेमुळे ऊसतोड मजुरांच्या वस्तीसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.





