Iltija Mufti : जम्मू-काश्मीरमधील वैद्यकीय विद्यार्थ्यांचे स्टायपेंड 30 हजार रुपये करा; इल्तिजा मुफ्ती यांचे सरकारला आवाहन
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती (Iltija Mufti) यांनी जम्मू-काश्मीरमधील आंदोलनकर्त्या एमबीबीएस आणि बीडीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात तातडीने भरघोस वाढ करण्याची मागणी केली आहे.

Iltija Mufti : पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती (Iltija Mufti) यांनी जम्मू-काश्मीरमधील आंदोलनकर्त्या एमबीबीएस आणि बीडीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात तातडीने भरघोस वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या मिळणारे १२,३०० रुपयांचे मासिक विद्यावेतन वाढवून ते ३०,००० रुपये करण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी श्रीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या इंटर्न डॉक्टरांच्या आंदोलनात सहभागी होत इल्तिजा मुफ्ती (Iltija Mufti) यांनी त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. आंदोलक डॉक्टरांशी संवाद साधताना इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या, अत्यंत कठीण आणि कष्टाचे काम करूनही जम्मू-काश्मीरमधील वैद्यकीय विद्यार्थ्यांना देशात सर्वात कमी स्टायपेंड दिले जात आहे, ही चिंतेची बाब आहे.
या डॉक्टरांना सलग १२ ते ४८ तासांच्या शिफ्टमध्ये काम करावे लागते. तरीही त्यांना मूलभूत सुट्ट्या आणि योग्य रजा नाकारल्या जातात. त्यांनी सरकारला आंदोलक विद्यार्थ्यांशी त्वरित सकारात्मक चर्चा करून कोणताही विलंब न करता स्टायपेंड ३०,००० रुपये करण्याचे आवाहन केले. तसेच, डॉक्टरांना कामाचे योग्य वातावरण आणि रजा मिळायला हव्यात, असेही त्या म्हणाल्या.
आपल्या मागणीचे समर्थन करताना इल्तिजा यांनी इतर राज्यांतील स्टायपेंडचे आकडे मांडले. ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे इंटर्न डॉक्टरांना दरमहा सुमारे ४५,००० रुपये मिळतात. उत्तर प्रदेश येथे स्टायपेंड १२,००० वरून थेट २५,००० रुपये करण्यात आले आहे.
बिहार सरकारनेही विद्यावेतनात वाढ केली आहे. भव्य आणि उधळपट्टी करणाऱ्या सरकारी कार्यक्रमांवर (Iltija Mufti) हजारो कोटींचा खर्च केला जातो, मग आरोग्य यंत्रणा अहोरात्र सांभाळणाऱ्या या तरुण डॉक्टरांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा सवाल पीडीपी नेत्याने केला.
वाढीव स्टायपेंड आणि कामाच्या चांगल्या परिस्थितीच्या मागणीसाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री सकिना इटू यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतन वाढीचा प्रस्ताव आधीपासूनच सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपाचे हत्यार उपसण्याची गरज नाही.






