सोलापूर : घरचे अठराविश्व दारिद्र्य, आर्थिक परिस्थितीमुळे पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडीलांचा गॅरेजचा तोडका- मोडका व्यवसाय, सहा माणसांचे कुटुंब चालविण्यासाठी सुरू असलेली धडपड अशा विपरीत परिस्थितीतही दृढनिश्चयाच्या बळावर सख्ख्या बहिणींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला. संजीवनी आणि सरोजिनी अशी त्या सख्ख्या बहिणी आणि पक्क्या मैत्रिणींची नावे आहेत. ज्योतीराम भोजने हे पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गॅरेज चालक वडीलाचे आणि गृहिणी असलेल्या आईचे रेश्मा नाव आहे. तर भाऊ श्रीनिवास याने खंबीर साथ दिल्याने यशाला गवसणी घातल्याचे संजीवनी आणि सरोजिनी यांनी सांगितले. ज्योतीराम भोजने हे गवळी वस्तीमधील कामगार वस्ती भागात राहतात. ज्योतीराम ज्या घरात राहतात ते घर पत्र्याचे असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले आयुष्य काढले आहे. ज्योतीराम यांना आपल्या वडिलांच्या आजारपणातच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या खचून गेले होते. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा तर विचार न केलेलाच बरा. परंतु दोन्ही मुलींनी बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. संजीवनी आणि सरोजिनीने २०१८ पासून एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याला सुरुवात केली. सात वर्षाच्या कालावधीत तीन वर्षे करोनाने अत्यंत हलाखीची परिस्थिती आणली. या काळात परीक्षाच होऊ न शकल्यामुळे त्या दोघी खचून गेल्या. संजीवनी आणि सरोजिनी या दोघी सख्ख्या बहिणी असल्या तरी त्या पक्क्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्या दोघींनी सुद्धा एमपीएससीमध्ये यश मिळवायचेच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीला सामोरे जात अखेर यशाचा झेंडा रोवलाच. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला. संजीवनी आणि सरोजिनी या दोघींनी सुद्धा सात वर्षात एकूण सहा एमपीएससीच्या मेन्स परीक्षा दिल्या. परंतु या सर्व वेळी त्यांना पॉईंटमुळे मागे पडावे लागत होते. मात्र जिद्द सोडली नाही. अखेर दोघिंना बुधवारच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्रीच गोड बातमी मिळाली. आई-वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कामगार वस्तीत अठरा विश्व दारिद्र्य आणि गँरेजच्या आलेल्या पैशातून दोन्ही मुलींना शिकविण्या आनंद आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. सख्खा भाऊ पाठीशी असल्यानंतर बहिणी यशात मागे कशी पडूच शकत नाहीत, याची अनुभूती या निमित्ताने दिसून आली आहे.