प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, पिक खर्चवाढ व बाजारातील स्पर्धा लक्षात घेऊन पेरू पिकासाठी आवश्यक असणाऱ्या फोम व कॅरीबॅगसाठी कृषी विभागामार्फत अनुदान द्यावे, या मागणीसंदर्भात शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली. तालुक्यात ४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरूची लागवड असून, महाराष्ट्राभरात पेरू क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती, अवेळी येणारा पाऊस, वाढती महागाई, मजुरीचे चढे दर आणि उत्पादन खर्चामुळे पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. दर्जेदार फळ उत्पादनासाठी फोम व कॅरीबॅग अत्यावश्यक असून त्याचा खर्च मोठा असल्याने, शासन स्तरावरून अनुदान मिळणे अत्यंत गरजेचे असल्याची, भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. या मागणीला कृषीमंत्री भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ही मागणी पूर्ण झाल्यास पेरू उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे खऱ्या अर्थाने देवदूत ठरणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भेटीप्रसंगी तुषार शेंडे, प्रवीण भोसले, वसंत हेगडे, अशोक हेगडे, संजय शेंडे, उमेश हेगडे, उत्तम भोंग, तुकाराम भोसले, वैभव भोसले, मयुर भोसले, बिट्टू हेगडे यांच्यासह वरकुटे खुर्द, निमगाव केतकी व शेळगाव येथील पेरू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर कृषी धोरणामध्ये पेरू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फोम व कॅरीबॅग अनुदानाचा समावेश करण्याबाबत प्रयत्न करु. सहकार व कृषी क्षेत्राची सांगड घालत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पन्न वाढणे, हाच शासनाचा उद्देश आहे.” – दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री