प्रभात वत्तसेवा इंदापूर – राज्यातील शेतकर्यांसाठी दिलासादायक घोषणा करताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकर्यांच्या हितासाठी घेतलेला कर्जमाफीचा निर्णय हा ऐतिहासिक ठरणार असून, या निर्णयामुळे राज्याच्या कृषी इतिहासात नवे पान लिहिले जाईल.इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.कृषिमंत्री भरणे म्हणाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शेतकरी कल्याण हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य बनले आहे. शेती हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे; शेतकर्यांच्या चेहर्यावर पुन्हा हास्य आणणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे.कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील लघु व सीमांत शेतकर्यांना या कर्जमाफी योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. कर्जाचा ताण कमी करून शेतीला नवसंजीवनी देणे हा सरकारचा उद्देश असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कृषी क्षेत्रासाठी ठोस वित्तीय नियोजन तयार केले आहे. त्याचा फायदा येत्या काही महिन्यांत राज्यभरातील शेतकर्यांना जाणवेल. गेल्या काही वर्षांत दुष्काळ, उत्पादन घट आणि बाजारातील दरातील अस्थिरतेमुळे शेतकरी वर्गावर वाढते ओझे आले आहे. या पार्श्वभूमीवर ही कर्जमाफी योजना राज्य सरकारच्या संवेदनशील दृष्टिकोनाचे प्रतीक ठरते. शेतकर्यांसाठी कठीण काळ.. मंत्री भरणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील शेतकरी कधीही विसरणार नाही. सध्याचा काळ हा शेतकर्यांसाठी अडचणीचा असला, तरी या कठीण काळात राज्य सरकारने शेतकर्यांच्या कर्जमाफीचे कार्य हाती घेतले, ही मोठी बाब आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कर्जमाफीची अंमलबजावणी केली; मात्र मी कृषिमंत्री म्हणून या काळात कार्यरत असणे, ही गोष्ट माझ्या कार्यकालाची कायमची नोंद राहील.