Datta Jayanti: नीरा दत्तघाटावर भाविकांची महागर्दी; ‘दिगंबरा दिगंबरा’च्या जयघोषात दत्तजयंती साजरी

प्रभात वृत्तसेवा
नीरा – ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ च्या जयघोषात नीरा (ता. पुरंदर) येथील दत्तघाटावरील दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री दत्त सेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीनिमित्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची, पताकांची सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
दत्तजन्म सोहळ्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.नीरा येथील नीरा नदीच्या पैलतीरावरील दत्तघाटावर दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती सोहळ्यानिमित्त नीरा-पाडेगाव येथील श्री दत्त सेवा मंडळ मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तीन दिवसीय दत्तचरित्र पारायण सुरू होते.
गुरुवार (दि.४) मार्गशीर्ष पोर्णिमा श्री दत्त जयंतीनिमित्त पहाटे काकडा आरती, सकाळी सात वाजता महाअभिषेक, श्री दत्त गायश्री व स्वामी गायत्री यज्ञ झाला. दुपारी २ ते ४ दरम्यान फलटण तालुक्यातील खडकी येथील एकतारी भजनी मंडळाने सेवा सादर केली. सायंकाळी ‘श्री जन्मांचे’ फुलाचे किर्तन झाले.
नीरा भजनीमंडळाने किर्तनास साथ दिली. सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान पारंपारिक पद्धतीने दत्त महाराजांचा जन्मसोहळा पार पडला. श्री दत्तजन्मानंतर मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता. दिवसभर ग्रामस्थांच्या वतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भाविकांकडून दर्शनाचा लाभ
दिवसभरात भजन, किर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलावर्गाने दत्तजन्म सोहळ्यानिमित्त एकत्रित येऊन पाळणा, नाव ठेवणे असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जन्मसोहळ्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आले.
सोहळ्यास ग्रामस्थांसह महिलावर्गाची मोठी उपस्थिती होती. दत्तजयंतीसाठी नीरासह वाल्हा, गुळूंचे, राख, पाडेगाव, लोणंद, सोमेश्वर, निंबूत, जेऊर, मांडकी परिसरातील भाविकांनी रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतला.





