Dashavatar : ‘दशावतार’च्या प्रिमिअरला आदित्य ठाकरेंच्या कृतीची चर्चा; ठाकरेंनी घेतला दिलीप प्रभावळकरांचा आशीर्वाद

Dashavatar: बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘दशावतार’चा प्रिमिअर 11 सप्टेंबर रोजी मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला. या प्रिमिअर सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्यासोबतच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली होती. यावेळी वरळीचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आदित्य ठाकरेंची विनम्र कृती चर्चेत
प्रिमिअरला करड्या रंगाचा फूल स्लीव्ह शर्ट आणि डेनिम परिधान करून आदित्य ठाकरे पोहोचले होते. त्यांनी उपस्थित कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे अभिनंदन करून खास फोटोंसाठी पोझ दिली. मात्र, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना भेटल्यावर आदित्य ठाकरेंनी दाखवलेली नम्रता सर्वांनाच भावली.
ते स्वतः प्रभावळकरांकडे गेले, आधी हस्तांदोलन केले आणि त्यानंतर त्यांच्या पायाशी वाकून आशीर्वाद घेतला. ही कृती पाहून उपस्थित पाहुण्यांसह सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले. अनेकांनी टिप्पणी करताना म्हटले की, “आदित्य ठाकरेंवर उत्तम संस्कार झालेले आहेत. ही कृती प्रत्येक राजकीय नेत्यासाठी आदर्श आहे.”
‘दशावतार’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता
आगामी मराठी चित्रपट दशावतार च्या टीम सोबत आदित्य ठाकरे 🔥 pic.twitter.com/SGeIC8DJMG
— Ashish (@error040290) September 12, 2025
सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ हा कोकणातील लोककला, अध्यात्म आणि गूढतेवर आधारित थरारक चित्रपट असून, 12 सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून, आता प्रिमिअरमधील आदित्य ठाकरेंची विनम्र कृती आणि दिलीप प्रभावळकरांचा गूढ अभिनय हे दोन्ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.




