Daryl Mitchell : टीम इंडियासाठी ‘व्हिलन’ ठरतोय डॅरिल मिचेल! सलग दुसरं शतक ठोकत मोडला सलमान बटचा विक्रम

Daryl Mitchell Century Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिचेलने पुन्हा एकदा आपल्या बॅटने भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवली. दुसऱ्या सामन्यात नाबाद शतकी खेळी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या मिचेलने इंदूरच्या होळकर स्टेडियमवरही शानदार शतक झळकावले. भारत आणि मिचेल यांच्यातील हे द्वंद्व आता ऐतिहासिक विक्रमांपर्यंत पोहोचले आहे.
डिव्हिलियर्सच्या यादीत पटकावलं स्थान; बटला टाकले मागे –
डॅरिल मिचेलने १०६ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिचेलचे हे चौथे शतक आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १३ सामन्यांत त्याने हा पराक्रम केला. भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांत ४ किंवा त्यापेक्षा जास्त शतके ठोकणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने सर्वाधिक ५ शतके ठोकली आहेत. मिचेलने आता पाकिस्तानच्या सलमान बटला (३ शतके) मागे टाकले आहे.
विल्यमसनच्या विक्रमाच्या जवळ –
Daryl Mitchell — The ODI Beast in India! 🥶🔥#INDVSNZODI #TeamIndia #darylmitchell #glennphillips
📷jiohotstar pic.twitter.com/32Vrfih55a
— CricInformer (@CricInformer) January 18, 2026
या मालिकेत मिचेलने सातत्यपूर्ण कामगिरीचा नमुना सादर केला आहे. भारताविरुद्ध सलग चार वेळा ५० पेक्षा जास्त धावा (५०+) करणारा तो दुसरा कीवी फलंदाज ठरला आहे:
- केन विल्यमसन: २०१४ मध्ये सलग ५ वेळा ५० अधिक धावा.
- डॅरिल मिचेल: सलग ४ वेळा ५० हून अधिक धावा.
त्याने ग्लेन टर्नर, स्टीफन फ्लेमिंग आणि रॉस टेलर यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे, ज्यांनी सलग ३ वेळा असा पराक्रम केला होता.
७ डावांत ६ वेळा ‘फिफ्टी प्लस’ स्कोर –
मिचेलचा सध्याचा फॉर्म थक्क करणारा आहे. त्याने गेल्या ७ एकदिवसीय डावांपैकी ६ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या गेल्या ७ डावांचा विचार केल्यास, त्याने ३ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. फिरकी असो वा वेगवान गोलंदाजी, मिचेलने भारतीय परिस्थितीशी जुळवून घेत टीम इंडियासाठी मोठे आव्हान उभे केले आहे.





