दर्शन मात्रे… भाग – 9 – पार्वतीनंदन (गणेशखिंड)

चापेकर बंधूंनी इंग्रज अकिधारी रॅंडचा वध करण्याआधी ज्या गणेशाचे दर्शन घेतले, तो गणेशखिंडीतील गणपती म्हणजे पार्वतीनंदन गणपती. चतु:शृंगी मंदिराकडून विद्यापीठाच्या रस्त्याकडे जाताना अगदी लागून जो बोळ आहे, तेथे डाव्या बाजूला हे मंदिर आहे. या मंदिरात प्रवेशण्याआधी तीन दगडी दीपमाळ असून, मंदिरात उजव्याबाजूला शेपूट वरच्या बाजूला केलेला मारूती आहे.
तसेच हे मंदिर शंभर वर्षांपूर्वीचे असल्याने याची बांधणीही त्याच पद्धतीची आहे. समोर ओसरी असून, त्यानंतर गाभारा आहे. या ओसरीतून लगेचच पार्वतीनंदनाचे दर्शन होते. लाकडी सभामंडप असून तोही जुन्या काळातील आहे. गणपतीसमोर छोटा उंदीर आहे. मूर्ती सुमारे दोन ते तीन फूट उंच असून, ती शेंदूर विलेपीत, चतुर्भुज आहे. मागील हातात शस्त्र आणि उजवा हात अभयमुद्रेत आहे. मूर्तीला दगडी मुकुट आहे. मंदिराच्या आवारात गणेशाला आवडणारा शमी वृक्ष आहे.
चापेकर बंधूंनी रॅंडचा वध याच गणेशखिंडीत केला. त्यावेळी त्यांनी या गणेशाचे आशीर्वाद घेतले होते. तसेच लोकमान्य टिळकांना त्यांनी रॅंडचा वध झाल्याचा निरोपही याच गणपतीच्या नावाने “गणेशखिंडीतील गणपती पावला’ अशा सांकेतिक भाषेत दिला होता. या प्रकरणातही लोकमान्य टिळकांचा हात असल्याचा संशय इंग्रजांनी व्यक्त केला होता.





