Dangerous Well: मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहतंय का प्रशासन? तडवळेतील ‘ती’ विहीर बनलीये मृत्यूचा सापळा
Dangerous Well: तडवळे (ता. खटाव) येथील मुख्य रस्त्यावरील विहिरीची संरक्षण भिंत कोसळल्याने रस्ता खचला; शाळकरी मुले आणि वाहनधारकांचा जीव टांगणीला.

Dangerous Well – तडवळे, ता. खटाव येथील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेली विहीर ये-जा करणार्या नागरिकांसाठी व शाळकरी मुले आणि वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. या विहिरीची संरक्षण भिंत कोसळल्यामुळे रस्ता खचला आहे. याठिकाणी कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने ग्रामस्थांमधून्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये या विहिरीची संरक्षण भिंत विहिरीत कोसळली होती. भिंत पडल्यामुळे रस्त्याचा मोठा भाग खचला आहे.
याच अरुंद आणि खचलेल्या रस्त्यावरून दररोज नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि अवजड वाहने ये-जा करत आहेत. आगामी पावसाळ्यात रस्ता अधिक खचून थेट विहिरीत कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, तडवळे ग्रामपंचायतीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊन या समस्येची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, बांधकाम विभागाने या संवेदनशील विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे रात्रीच्या वेळी एखादे वाहन विहिरीत कोसळून मोठी जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल प्रशासक तथा सरपंच सौ रूपाली खाडे यांनी प्रशासनाला केला आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ या विहिरीची दुरुस्ती करावी किंवा सुरक्षिततेसाठी मजबूत संरक्षण भिंत/बॅरिकेड्स उभारावेत, अशी मागणी सरपंच रुपाली खाडे व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
तहसीलदारांच्या पाहणीनंतरही कारवाई शून्य
विशेष बाब म्हणजे, स्वतः तहसीलदारांनी या धोकादायक विहिरीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. मात्र, या पाहणीला बराच काळ उलटूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अधिकार्यांच्या या संथ कारभारामुळे ग्रामस्थांमधून्र नाराजी व्यक्त होत आहे.





