Khopoli News: खोपोलीतील धोकादायक स्वागत कमान जमीनदोस्त
Khopoli News: रात्रीच्या वेळी कमान पाडण्यात आल्याने ती अचानक कोसळल्याची अफवा परिसरात पसरली

खालापूर – खालची खोपोली येथील आमरधाम स्मशानभूमीजवळील जीर्ण झालेली स्वागत कमान खोपोली नगरपालिकेने गुरुवारी (दि. १६) रात्री जमीनदोस्त केली. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
खोपोली बाजारपेठेचे मुख्य प्रवेशद्वार असलेली ही स्वागत कमान अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत होती. याच परिसरात गुरुवारचा आठवडी बाजार भरत असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच या मार्गावरून दररोज अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे कमान कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ती हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत कमान पाडण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी खोपोली नगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका यांसह आवश्यक यंत्रणा घटनास्थळी तैनात होती. तसेच नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, परिवहन सभापती किशोर पाटील यावेळी उपस्थित होते.
रात्रीच्या वेळी कमान पाडण्यात आल्याने ती अचानक कोसळल्याची अफवा परिसरात पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले. मात्र ही कमान नगरपालिकेने नियोजनपूर्वक पाडल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. खोपोलीकरांचा विश्वास, शहराची सुरक्षितता आणि जनहित यांना प्राधान्य देत आपण सदैव कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी सांगितले.
Dussehra 2026 : सोने कचऱ्यात टाकू नका…; आपट्याच्या पानांमुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार





