Dussehra 2026 : सोने कचऱ्यात टाकू नका…; आपट्याच्या पानांमुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार
Dussehra 2026 : मातीचे तापमान संतुलित राखण्यास होते मदत

पिंपरी – दसरा म्हटला की सीमोल्लंघन, विजयाचा उत्सव आणि आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोने लुटण्याची परंपरा डोळ्यासमोर उभी राहते. दसऱ्याच्या दिवशी सोन्याचे प्रतीक मानून दिल्या जाणाऱ्या या पानांचे सणानंतर काय होते, याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष केले जाते. काही जण ही पाने जपून ठेवतात, तर काही जण ती कचऱ्यात टाकतात.
मात्र या पानांचा योग्य वापर केल्यास नैसर्गिक खतनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागू शकतो. तसेच सध्या राज्यात दुष्काळाचे सावट आहे. भविष्यात तापमान अधिक वाढून बाष्पीभवनामुळे भूजलस्तर घटण्याची, तसेच झाडांच्या मुळांना पुरेसे पोषण न मिळण्याची भीती आहे. झाडाच्या किंवा रोपाच्या बुंध्यापासून थोडे अंतर ठेवून आपट्याची पाने ठेवल्यास ती गुणकारी ठरु शकतात.
आपट्याची वाळलेली पाने कुजून मातीत मिसळल्याने सेंद्रिय पदार्थांची भर पडते. त्यामुळे जमिनीची रचना आणि सुपीकता सुधारण्यास मदत होते. झाडांच्या बुंध्याभोवती पानांचा पातळ थर पसरवल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसेच पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन मातीचे तापमान संतुलित राखण्यास हातभार लागतो. पानांचे आच्छादन केल्यामुळे तणांची वाढही काही प्रमाणात नियंत्रित होऊ शकते.
घराच्या परिसरातील झाडे, बागेतील रोपे आणि कुंड्यांमधील मातीसाठी या पानांचा उपयोग करता येतो. पाने स्वतंत्रपणे कुजवून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे हा आणखी एक पर्यावरणपूरक पर्याय आहे. मात्र पानांचा थर झाडाच्या खोडाला चिकटून राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. खोडाभोवती थोडी मोकळी जागा ठेवल्यास अतिरिक्त ओलाव्यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य समस्या टाळता येतात.
परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड
दसऱ्याला आपट्याची पाने देण्यामागे सोने वाटण्याची सांस्कृतिक भावना आहे. या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड दिल्यास सणानंतर निर्माण होणारा कचरा कमी करण्यास मदत होऊ शकते. नागरिकांनी वापरलेली पाने रस्त्यावर, नाल्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकण्याऐवजी कंपोस्टमध्ये मिसळावीत किंवा योग्य पद्धतीने झाडांभोवती आच्छादन म्हणून वापरणे महत्त्वपूर्ण ठरते.
सण साजरे करताना निसर्गाप्रती जबाबदारी जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दसऱ्याचे सोने केवळ एकमेकांना देण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यातून झाडे, माती आणि पर्यावरणाचे संवर्धन साधले, तर या पारंपरिक सणाला अधिक अर्थपूर्ण आणि पर्यावरणपूरक स्वरूप देता येईल.
आरोग्यासाठीही उपयुक्त
आपट्याच्या वनस्पतीचा पारंपरिक औषधी उपयोग केला जातो. काही प्रयोगशाळीय संशोधनांमध्ये या वनस्पतीच्या अर्कांमध्ये प्रतिजैविक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. रक्तातील साखरेवरील संभाव्य परिणामांसह विविध आरोग्यविषयक उपयोगांचाही अभ्यास सुरू आहे. आपट्याची पाने त्यांच्या अँटीहिस्टामिनिक प्रभावामुळे दम्याच्या उपचारांमध्ये पारंपारिकपणे वापरली जातात. आपट्याची पानं पित्त आणि कफ दोषांवर गुणकारी आहेत. कोणताही औषधी वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा:





