बेजबाबदारपणाचा कहर : नागरिकांकडून कचऱ्यात फेकले जात आहेत “मास्क’
पिंपरी – करोनापासून वाचण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी तोंडाला मास्क लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे मास्क कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात फेकले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जे सफाई कर्मचारी नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून झटत आहेत, त्यांचेच आरोग्य धोक्यात आणण्याचे प्रकार शहरातील नागरिक करत असल्याचे दिसून येत आहे.
“करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यसाठी पिंपरी चिंचवड शहरात 21 दिवसांचे “लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. या विषाणूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वच नागरिक तोंडाला मास्क लावत आहेत. मात्र मास्क वापरुन झाल्यानंतर कोणतीही काळजी न घेता तो कचऱ्यात टाकला जात आहे. घराघरातून उचलण्यात आलेला कचरा सफाई कामगार डम्पिंग ग्राऊंडवर नेत असतात. मात्र अशा मास्कमुळे संसर्गाचा धोका संभवतो. कचरा विलगीकरण केंद्रात काही कामगार प्रक्रिया शक्य असलेला कचरा वेगळा करतात. तर प्रक्रिया शक्य नसलेल्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र अनेक ठिकाणच्या कचऱ्यामध्ये वापरलेले मास्क आढळून आले आहेत. एखाद्या बाधित रुग्णाने हा मास्क वापरला असल्यास सफाई कामगारांच्या आरोग्याला धोका संभवतो.
मास्कची विल्हेवाट कशी लावाल
वापरलेला मास्क कागद किंवा एखाद्या पिशवीत बांधून कचऱ्यात टाकावा अशी सूचना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडून केली जात आहे. एकदा मास्क वापरुन झाल्यानंतर त्याच्या मागचे ईलास्टिक काढताना तो मास्क चेहरा व कपड्यांपासून दूर ठेवावा आणि लगेच योग्य ती काळजी घेऊन कचऱ्याच्या डब्यात टाकावा. तसेच मास्क काढल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेव. कापडी मास्क वापरुन झाल्यानंतर दररोज डेटॉलच्या पाण्यामध्ये धुवावेत.
कचरा गोळा करण्यासाठी आम्ही शहरामध्ये फिरत असतो. अनेक वेळा कचऱ्यामध्ये वापरलेले मास्क सापडलेले आहेत. नागरिकांनी मास्क अशाप्रकारे कचऱ्यात टाकणे योग्य नाही. त्यामुळे आमच्याही जीवाला धोका आहे. वापरलेले मास्क नागरिकांनी जबाबदारी ओळखून पिशवीत किंवा पेपरमध्ये बांधून टाकले तर चांगले होईल.
– सफाई कामगार.