MSEDCL : महामार्गाच्या कामात वीजवाहिन्यांचे नुकसान; ‘एनएचएआय’च्या कामावर महावितरणचा आक्षेप
MSEDCL : रस्त्याचे काम करण्यापूर्वी वीजवाहिन्यांची जागा निश्चित करून त्यांचे सुरक्षित स्थलांतर करणे आवश्यक

पिंपरी – वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या कामादरम्यान १६, १७ आणि ३१ ऑक्टोबर रोजी वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने महावितरणला आर्थिक फटक्याबरोबरच वीज ग्राहकांना नाहक अंधारात राहावे लागले आहे.
वारंवार सूचना देऊनही वीजवाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापूर्वी काम सुरू ठेवल्याचा आक्षेप महावितरणने घेतला आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महामार्गाच्या रुंदीकरणासह सेवा रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिन्यांचे नियमानुसार स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने महावितरणकडून अंदाजपत्रक मंजूर करून घेऊन आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मंजुरी घेतली आहे, मात्र, पुणे महापालिका हद्दीतील कामासाठी अशी परवानगी घेतलेली नसल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्वसूचना देऊनही काम सुरू ठेवल्याने वीजवाहिन्यांचे नुकसान होत असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांच्या रोषाला महावितरणला सामोरे जावे लागत आहे.
महामार्गाच्या कामादरम्यान १६ ऑक्टोबर रोजी २२ केव्ही बेव्हर्ली फिडरची केबल तोडण्यात आली. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी बिटवाइज चौक परिसरात २२ केव्ही निया फिडरच्या केबलचे नुकसान झाले. ३१ ऑक्टोबर रोजीही केबल नादुरुस्त झाल्याची घटना घडली.
वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवताना महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. केबल दुरुस्ती आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून, महावितरणच्या महसुलावरही परिणाम होत आहे.
या मार्गावरील २२ केव्ही उच्चदाब आणि लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांचे योग्य नियोजन न करता रस्त्याचे काम पूर्ण केल्यास भविष्यात गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास औंध, बाणेर आणि महाळुंगे परिसरातील मोठ्या संख्येने वीजग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करण्यापूर्वी वीजवाहिन्यांची जागा निश्चित करून त्यांचे सुरक्षित स्थलांतर करणे आवश्यक आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजवाहिन्या रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध येण्याची किंवा काँक्रीटखाली गाडल्या जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत केबलमध्ये बिघाड झाल्यास दोष शोधणे आणि दुरुस्ती करणे अत्यंत कठीण होईल.
त्यासाठी काँक्रीटचा रस्ता खोदण्याची वेळ आल्यास दुरुस्तीला विलंब होऊन लाखो ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होऊ शकतो. महामार्गासारखी महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारताना वीजपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सुविधेचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेऊनच काम करावे, अशी महावितरणची भूमिका आहे.
महावितरणच्या औंध उपविभागांतर्गत बाणेर शाखा कार्यालयाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी बावधन पोलीस ठाण्यात याबाबत रीतसर तक्रार दाखल केली आहे.
पूर्वसूचना देऊनही वीजवाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापूर्वी काम सुरू ठेवल्याचा आक्षेप तक्रारीत नोंदविण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित कंत्राटदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
PCMC News: कुणाचा दबाव, कुणाचा असहकार महापालिकेचा खेळखंडोबा…!





