पिंपरी | अतिपावसाने भातशेतीचे नुकसान

नाणे मावळ, (वार्ताहर) – जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिन्यातील पहिला सप्ताह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील ओढे, नाले नद्या दुथडी भरून वाहत होत्या, तर भात खाचरे तु़डुंब भरली होती. तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात भातशेती करतात.
मावळातील पावसाळी वातावरण भात शेतीला पूरक आहे. परंतु ‘अति तिथे माती’ या उक्तीप्रमाणे अतिपावसामुळे शेतीचे नुकसान होते. नाणे मावळ भागात अनेक ठिकाणी अतिपासामुळे भात शेतीचे नुकसान होत असल्याचे चित्र दिसत आहे.
मावळात ग्रामीण भागात काही ठिकाणी भात पिकाला गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पावासने पाणीपुरवठा झाला आहे. कित्येक दिवस भातशेती पाण्याच्या प्रवाहात होती. नाणे मावळात पावसाचा जोर वाढल्याने भात शेतात पाणी तुंबून पिक कुजण्याचे प्रमाण वाढले आहे.
नाणेमावळ विभागातील नदीकाठच्या काही गावात भात पिकात पाणी साठून पिके कुजण्यास सुरुवात झाली आहे. गोवित्री परिसरात हे प्रमाण अधिक आहे.
यंदा अगोदर मान्सूनपूर्व वळीवाने चांगली हजेरी लावली होती. त्यानंतर पेरणीयोग्य वातावरण पाहून शेतकऱ्यांनी पेरणी केली. सोबत पावसाने साथ दिल्याने भात रोपे चांगली झाल्याने लागवडी झाल्या.
परंतु यानंतर सुरू झालेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका काही शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील चांगली तरारलेली पिके आता कुजताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने संबंधित ठिकाणी तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.





