पुणे जिल्हा | ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सामाईक विहिरीचे नुकसान

मंचर, (प्रतिनिधी) – साकोरे (ता.आंबेगाव) येथे ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने विहिरीलगतची जमीन व भिंत खचून मातीचा राडारोडा विहिरीत गेल्याने सामाहिक विहीर बुजवली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्र्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने नुकताच पंचनामा केला आहे.
साकोरे ते वडगाव काशिंबेग रस्त्यालगत सुरेश महिपती मोढवे, उल्हास महिपती मोढवे, चंद्रकांत महिपती मोढवे व सुनील महिपती मोढवे यांच्या सामुहिक मालकीची विहीर आहे. मोढवे कुटुंबीयांनी गट क्रमांक २६१ मध्ये सन १९८५ मध्ये ६० फूट खोल विहीर तयार केली होती. त्यावर दगडी बांधकाम केले होते.
घोडनदीपासून उत्तर बाजूला ८०० ते एक हजार फूट विहीर लांब आहे. ७० हजार रुपये किमतीच्या साडे सात अश्वशक्ती क्षमतेच्या दोन विद्युत मोटारी विहिरीवर बसविण्यात आल्या होत्या.
या विहिरीवरून शेतीला व घरी पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या आठ ते दहा दिवसापासून कोसळत असलेल्या पावसाने विहिरीसभोवतालची जमीन भूसभूशीत झाली.
जमिनीला चीर पडून दगडात बांधलेली विहीर ढासळली आहे. जवळपास २५ ते ३० फुट विहीर गाडून गेली आहे. त्यामुळे शेतकर्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
दरम्यान गावकामगार तलाठी नितीन चंद्रकांत माने व पंकज सातकर यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला आहे. यावेळी सरपंच अशोकराव मोढवे, कोंडीभाऊ गाडे, अनिल गाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नुकसान भरपाई द्यावी
साकोरे परिसरात गेल्या काही दिवसापासून सतत मुसळधार पाऊस होत आहे. तीन दिवसापूर्वी ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसाने विहीरी गाडली गेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व गुरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकूण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी,’’ अशी मागणी सुनील मोढवे यांनी केली आहे.





