Satara: नजर अंदाज पाहणीनंतर नुकसानीचे पंचनामे; ना. शंभूराज देसाई
Satara दुष्काळसदृश स्थितीची प्राथमिक यादी अंतिम नसल्याचे सांगत ना. देसाई यांनी पूर्व भागातील परिस्थितीची गंभीर दखल घेतली.

Satara: सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद होत असतानाच राज्याच्या प्राथमिक दुष्काळसदृश यादीत सातारा नसल्याने निर्माण झालेली चिंता दूर करण्याचा प्रयत्न पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. माण-खटावसह फलटण, खंडाळा आणि कोरेगावच्या उत्तर भागाची नजरअंदाज पाहणी करून प्रत्यक्ष पीकस्थिती तपासली जाईल आणि त्यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेल्या 90 दिवसांच्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. याचवेळी कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हलच्या माध्यमातून सातार्याला पर्यटनाच्या नव्या नकाशावर नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाटण येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासह कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि जिवाजी महाले स्मारकाच्या कामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतल्यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे उपस्थित होते.
दुष्काळाच्या यादीत नाव नाही, पण सरकारचे लक्ष
दुष्काळसदृश स्थितीची प्राथमिक यादी अंतिम नसल्याचे सांगत ना. देसाई यांनी पूर्व भागातील परिस्थितीची गंभीर दखल घेतली. पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे केले जातील. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पूर्व भागातील पावसाची कमतरता आणि पाण्याच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पीक पाहणीचे आतापर्यंत 17 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली.
90 दिवसांत सातारा गॅझेट?
सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत देसाई यांनी सरकारच्या भूमिकेचा बचाव केला. हैदराबाद गॅझेट लागू करताना आलेल्या अडचणींच्या तुलनेत सातारा गॅझेटची प्रक्रिया कमी वेळात पूर्ण होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. समितीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले असून त्यांचा या विषयाचा अभ्यास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोयना बॅकवॉटरला पर्यटनाचा ‘बुस्टर’
तापोळा आणि मुनावळे परिसरात कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल आयोजित करण्याचे नियोजन आहे. फ्लोटिंग मार्केट, हेलिकॉप्टर राईड, वेलनेस सेंटर आणि फूड फेअर यांसारख्या उपक्रमांसह किमान एक हजार पर्यटकांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपलब्धतेनुसार उद्घाटनाची तारीख निश्चित होणार आहे. महाबळेश्वरमध्ये 24 डिसेंबर ते 13 जानेवारीदरम्यान दोन मोठे इव्हेंट होणार असल्याचेही ना. देसाई यांनी सांगितले.
प्रतापगडावर जिवाजी महालेंचा पुतळा
प्रतापगडावरील ऐतिहासिक परिसरात वीर जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत पुतळ्याचे प्रारूप निश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक समिती काम करणार आहे.
स्मार्ट मीटरवर सावध भूमिका
स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात गावागावांतून आवाज उठत असताना महावितरणकडून नेमकी कोणती कार्यवाही सुरू आहे, याची माहिती घेऊनच भूमिका मांडू, असे ना. देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रश्नावर सरकारची भूमिका अद्याप सावध असल्याचे दिसून आले.





