Maharashtra Rain : राज्यात पूरस्थिती असतानाच आता ‘या’ संकटामुळे धाकधूक वाढली

मुंबई : राज्याला काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: मराठवाड्यात धो धो पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरुच आहे. तसेच वाशिम, नाशिक, ठाणे, रायगडसह मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याशिवाय अनेक धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आल्याने पुन्हा एकदा धाकधूक वाढली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातल्याने रस्त्यांवर सखल भागात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसच काही ठिकाणी वीजेचा लपंडावही सुरु झाला आहे.
परभणी जिल्ह्यातही पावसाचा हाहा:कार सुरु असून जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणातून 56060.53 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असून नजीकच्या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिकच्या गोदावरीचा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून सध्या 1 लाख 98 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.





