Satara news : धरण व्यवस्थापनांनी विसर्गाचे काटेकोर नियोजन करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : कोयना धरणासह जिल्ह्यातील विविध प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १६ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढत आहे. कोयना धरणात जवळपास १०० टीएमसी साठा होत आला आहे. धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे. धरणात ८१ हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे नऊ फुटांवरून ११ फुटांपर्यंत उघडण्यात येणार आहेत.
धरणातील पाण्याचा विसर्ग ८० हजार क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास बाधित होणार्या लोकांना स्थलांतरित करण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक तजवीज ठेवावी. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या धरण कार्यस्थळावर क्युसेक थांबावे. लोकांची गैरसोय होऊ दिले. नये, म्हणून तालुकास्तरीय आणि क्षेत्रीय यंत्रणांनी दक्ष रहावे. कोणीही मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट निर्दे श पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील पर्जन्यस्थितीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीवरुन घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता काटकर, कोयना धरण विभागाचे कार्यकारी अभियंता महेश राशिनकर, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव व अधिकारी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी धरण व्यवस्थापनांनी विसर्गाचे काटेकोर नियोजन करावे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे. या भागात पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी.
जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक औषधसाठा ठेवावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यस्थळांवर २४ बाय ७ उपस्थित रहावे. साथीचे रोग, अतिसार, ताप थंडी अशा आजारांवरील औषधे रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी जनरेटर सेट उपलब्ध ठेवावेत. दुर्गम भागातील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने दक्ष राहावे.
लोकांना स्थलांतरित करायची आवश्यकता भासल्यास त्यांच्या अंथरुण, पांघरुन, पिण्याचे स्वच्छ पाणी, जेवण, औषधे यांची तजवीज ठेवावी. कोयनानगर कॉलनीतील रिकाम्या काटर्स सुस्थितीत ठेवाव्यात.
झाडेझुडपे उन्मळून रस्त्यावर पडल्यास, दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्यास जेसीबी लावून रस्ता तात्काळ मोकळा करावा. ज्या ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाऊन, गावांचे संपर्क तुटत आहे, अशा ठिकाणी धोक्याच्या सूचनांचे फलक लावावेत. कोयना धरणाचा जवळपास १०० टीएमसी साठा होत आला आहे. धरणस्थळावर उद्या जलपूजन करून, ठिकठिकाणी परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा, आवक, विसर्ग, धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, पाटण, नवजा, तापोळा, कोयना, दरे, महाबळेश्वर, सातारा, केळघर, मेढा, जावळी येथील पर्जन्यस्थितीची माहिती पालकमंत्र्यांना दिली. कृष्णा व कोयनाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, सर्व अधिकारी फील्डवर राहतील, असेही त्यांनी निर्देशित केले.





