Satara: महाबळेश्वर-तापोळा मार्गावर वाहतुकीचा रोजचाच खोळंबा
महाबळेश्वर-तापोळा मार्ग हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या मार्गावरून ग्रामीण भागातील नागरिकांची दररोज सकाळी महाबळेश्वरकडे येणार्या आणि सायंकाळी गावाकडे परतणार्या प्रवाशांची वर्दळ असते.

Satara: महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, खचलेल्या मोरीमुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आता मखारिया हायस्कूल ते बॅबिंग्टन पॉईंट दरम्यान मंजूर सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामापूर्वी बाजूच्या गटाराचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कामासाठी मोठ्या डंपरची दिवसा सुरू असलेली वाहतूक अरुंद रस्त्यावर अडथळा ठरत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
दिवसभर वाहनांची वर्दळ, त्यात पर्यटन हंगामाची भर
महाबळेश्वर-तापोळा मार्ग हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या मार्गावरून ग्रामीण भागातील नागरिकांची दररोज सकाळी महाबळेश्वरकडे येणार्या आणि सायंकाळी गावाकडे परतणार्या प्रवाशांची वर्दळ असते. सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने त्यामध्ये पर्यटकांच्या वाहनांचीही मोठी भर पडली आहे. अशा परिस्थितीत दिवसा मोठ्या डंपरची वाहतूक सुरू ठेवल्याने वाहतुकीचा ताण वाढत असून, काही वेळा दोन-दोन तास वाहनचालकांना कोंडीत अडकून पडावे लागत आहे. यामुळे नागरिकांचे वेळापत्रक कोलमडून दैनंदिन कामांवरही परिणाम होत आहे.
विकासकामांना विरोध नाही; वाहतुकीचे नियोजन हवे
रस्त्याचे आणि गटाराचे काम बंद ठेवणे हा समस्येवर उपाय नसून, विकासकामे सुरू ठेवतानाच वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. मोठ्या डंपरची वाहतूक सायंकाळी वर्दळ कमी झाल्यानंतर किंवा गर्दीच्या वेळा टाळून करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच शक्य असल्यास मोठ्या डंपरऐवजी छोट्या वाहनांमधून साहित्याची वाहतूक केल्यास अरुंद रस्त्यावर निर्माण होणारा अडथळा कमी होऊ शकतो.
ठेकेदाराच्या सोयीला प्राधान्य की नागरिकांच्या सुविधेला?
पालिकेचे अधिकारी नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष देण्याऐवजी ठेकेदाराच्या सोयीला अधिक प्राधान्य देत असल्याची टीका शहरातून होत आहे. ठेकेदाराच्या कामासाठी पायघड्या घातल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, पालिका प्रशासनाच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यकर्ते, नगरपालिका प्रशासन, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी समन्वय साधून डंपर वाहतुकीच्या वेळा निश्चित कराव्यात, गर्दीच्या काळात मोठ्या वाहनांची वाहतूक टाळावी आणि नागरिकांचा प्रवास सुरळीत राहील यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.





