दैनिक ‘प्रभात’तर्फे 70 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

पुणे – दैनिक “प्रभात’कडून यंदाही दिशा परिवाराच्या सहयोगातून 70 विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. याचबरोबर दैनिक “प्रभात’ आणखी 70 विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणार आहे. शनिवारी, दि. 2 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे,’ अशी माहिती दैनिक “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी दिली.
दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्रदान समारंभ घोले रत्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे रविवारी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात दैनिक “प्रभात’च्यावतीने 70 विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. मागील 17 वर्षांपासून दिशा परिवारातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती वितरण उपक्रमात दैनिक “प्रभात’देखील मागील 12 वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करत आहे.
दरम्यान, या सोहळ्यास “नाफेड’चे अतिरिक्त कार्यकारी संचालक सुनीलकुमार सिंग, आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब जाधव, दिशा परिवाराचे अध्यक्ष माणिकराव गोते, तसेच महेंद्र खंडेलवाल, अरुण कुलकर्णी, विवेक अगरवाल, पौर्णिमा जानोरकर, नंदकिशोर रोजेकर, दिशा परिवाराचे राजाभाऊ चव्हाण आणि कल्पना चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राजापूरचे गजानन जोशी आणि अनंत रानडे या दोघांना दिशा परिवारचा “सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे – बी. एल. स्वामी
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बी. एल. स्वामी म्हणाले, “दिशा परिवारातील माजी विद्यार्थी अर्थात कार्यकर्त्यांचे कौतुक होणे आवश्यक आहे. माजी विद्यार्थी आता मोठ्या कंपन्यांमध्ये तसेच शासकीय अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्यात कोणताही “इगो’ नाही. त्यांच्याकडूनही आता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत होत आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. दिशा परिवारात राजाभाऊ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे दिले. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करणे आवश्यक आहे. या सतरा वर्षांच्या दिशा परिवाराच्या वाटचालीत चव्हाण यांच्याबरोबर दात्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.’
आमदार धंगेकर म्हणाले, “प्रत्यक्ष मदत करणाऱ्यांकडून थेट विद्यार्थ्यांना मदतीचा धनादेश देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. दिशा परिवाराच्या भावनिक व कौटुंबिक सोहळ्यातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे कार्य होत आहे. मदतीतून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनीही दिशा परिवारला विसरू नका.’
प्रा. भाऊसाहेब जाधव म्हणाले, “दिशा परिवाराच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोठे काम होत आहे. आताच्या युवक-युवतींमध्ये आपणही समाजाला काही तरी देणे लागतो, ही मानसिकता वाढली आहे. त्यामुळे दिशा परिवाराचे कार्य यापुढे आणखी जोमाने वाढेल, असा विश्वास वाटतो.’
“दिशा परिवारच्या पुढाकारातून मिळालेल्या आर्थिक सहाय्याने हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करत ते स्वावलंबी बनले. आता हेच युवक-युवती गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. हे युवक समाज, प्रगती आणि विचारांचे दूत आहेत. युवा पिढीने अशाच पद्धतीने समाजाला पुढे नेण्याचे कार्य करावे.” – सुनीलकुमार सिंग, अतिरिक्त कार्यकारी संचालक, ‘नाफेड’




