Sangvi Phata : सांगवी फाटा येथे पदपथ मोकळा, भिंत नव्याने उभारली
Sangvi Phata: प्रभातमधील वृत्ताची दखल घेत प्रशासनाची तातडीने कारवाई

Sangvi Phata : सांगवी फाटा येथील बा. रा. घोलप बस थांबा परिसरातील पदपथावर संरक्षक भिंतीचा राडारोडा पडून पादचाऱ्यांना होत असलेल्या गैरसोयीबाबतचे वृत्त दै. ‘प्रभात’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने तत्काळ दखल घेत प्रभावी कारवाई केली.
पदपथावरील संपूर्ण राडारोडा हटवून कोसळलेली भिंत नव्याने उभारण्यात आली असून परिसर पुन्हा सुरक्षित करण्यात आला आहे.
या ठिकाणी शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय रुग्णालय असल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
मात्र, भिंत कोसळल्याने आणि राडारोडा साचल्याने पादचाऱ्यांना मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे दै. ‘प्रभात’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करत पदपथ पूर्ववत केला.
याशिवाय, नव्याने उभारण्यात आलेल्या भिंतीसह सभोवतालच्या भिंतींची रंगरंगोटीही करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील बकालपणा दूर होऊन पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुशोभित वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत दै. ‘प्रभात’ आणि संबंधित विभागाचे आभार मानले आहेत.




