पुणे | नेत्रहीन विद्यार्थ्यांची पुस्तक दहीहंडी!

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड या संस्थेच्या वतीने नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी पुस्तक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही हंडी ऑडिओ बुक्स, वह्या, पेन, चॉकलेट्स इ. शैक्षणिक साधनांनी भरलेली होती.
पुस्तकहंडी फोडण्यासाठी सगळ्या नेत्रहीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी तीन- चार वेळा प्रयत्नांची शिकस्त केली. पूर्णतः अंध असलेला महेश चव्हाण या विद्यार्थ्याने वर चढून हंडीला सलामी दिली. त्यानंतर अंध असलेली संस्थेची विद्यार्थिनी सुलोचना हावळे हिला हंडी फोडण्यात यश आले.
याप्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी, जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल देशमुख, विश्वस्त देवता देशमुख उपस्थित होत्या.
या उत्सवात सहभागी झालेल्या नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले, तसेच संस्थेत शिकत असलेल्या नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली
याप्रसंगी मेधा कुलकर्णी म्हणाल्या, नेत्रहीन विद्यार्थ्यांचा हा आगळावेगळा दहिहंडी उत्सव नक्कीच प्रेरणा देणारा असा आहे. राहुल देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन देवता अंदुरे देशमुख यांनी केले.




