Dagdusheth Halwai Ganpati: पुण्यातच घडणार थेट वृंदावनचे दर्शन! यंदा ‘दगडूशेठ’ गणपतीसाठी साकारली जाणार ‘ही’ भव्य वास्तू
Dagdusheth Halwai Ganpati: बुधवार चौकातील भव्य कमान आणि 'रनिंग मांडवावर' कृष्णलीलेचे प्रसंग; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मुख्य देखाव्याची वैशिष्ट्ये जाहीर.

Dagdusheth Halwai Ganpati – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी,
उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतीश रासने, तुषार रायकर आदी उपस्थित होते. सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा यंदाचे कलादिग्दर्शक नितेश कुमार यांच्या हस्ते गरुवारी झाला. भव्य स्तंभ, प्रकाशमान घुमट आणि कृष्णलीलांचे दर्शन यांसाठी सुपरिचित असलेल्या या मंदिराची प्रतिकृती यंदा गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल, असे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने यांनी सांगितले. प्रतिकृतीचा दर्शनी भाग संगमरवरी वास्तुकलेपासून प्रेरित असेल. उत्तर भारतीय मंदिराच्या पारंपरिक रचनेचे प्रतिबिंब दर्शवणारे स्तंभ आणि घुमट, रासलीला, गोवर्धन लीला, झुला यांसारखे शिल्पपट असणार आहेत. फुलांची सजावट, पवित्र शुभचिन्हे आणि आकर्षक रोषणाईमुळे मंदिर उजळून निघणार आहे. प्रारंभी बुधवार चौकामध्ये आकर्षक नक्षीकाम असलेली भव्य कमान साकारण्यात येणार आहे.
मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रनिंग मांडवावर कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारण्यात येणार आहेत. मंदिराच्या वर दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्तीही असेल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. गाभारा आणि मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून, भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक नितेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स प्रा. लि. यांनी मंदिराच्या प्रतिकृतीचे काम केले आहे.





