बारामतीत 29 ग्रामपंचायतींवर ‘दादाराज’; पदाधिकाऱ्यांत उत्साह संचारला

बारामती/ जळोची -बारामती तालुक्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा डंका पिटला गेला आहे. 31 पैकी 29 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जिंकलेल्या आहेत. अर्थात कार्यकर्त्यांनी मात्र अजित पवार किंवा शरद पवार गट असे न मानता आम्ही सर्व पवार कुटुंबाचे अशा स्वरूपाची देखील मते व्यक्त केली, परंतु बहुतांश वेळा जयघोष मात्र अजितदादांच्या नावाचा होत होता.
पारवडीत भाजपने सत्ता राखली असून चांदगुडेवाडीत मात्र भाजपचा सरपंच विजयी झाला आहे. राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. चांदगुडेवाडीत भाजपचा सरपंच विजयी झाला आहे. राष्ट्रवादीचे पाच तर भाजप गटाचे चार उमेदवार विजयी झाले. पारवडीत मात्र संपूर्ण सत्ता भाजपने राखली. तब्बल नऊ जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले, या ठिकाणी सरपंच भाजपचाच निवडून आला.
ही दोन गावे वगळता इतर गावांमध्ये राष्ट्रवादीने निर्विवाद सत्ता राखली. सर्व गावांत राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये चुरशीच्या निवडणूक लढती झाल्या. भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवईमाळ, आंबी बुद्रुक, पानसरेवाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कडेपठार, काळखैरेवाडी, चौधरवाडी, वंजारवाडी, करंजेपूल, धुमाळवाडी, कऱ्हावागज, सायंबाचीवाडी, कोऱ्हाळे खुर्द, शिर्सुफळ मेडद, सुपा, गुणवडी, डोर्लेवाडी या गावांमध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व राखले.





