Dada Bhuse : शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजींची बदली रद्द! बदलीला स्थगिती देत शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेला जागतिक स्तरावर नेणारे शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांची बदली रद्द करून त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्यावर राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांच्या उन्नती आणि विकासाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची मोठी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जालिंदरनगर येथे केली.शिक्षणमंत्री दादा भुसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या जागतिक आदर्श शाळा प्रकल्पात एक कोटीचे बक्षीस मिळवलेल्या शिक्रापूर येथील वाबळेवाडी आणि खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.
वाबळेवाडी येथे त्यांनी लोकवर्गणीतून उभी राहिलेली शाळा आणि तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर जालिंदरनगर येथे वारे गुरूजींनी विकसित केलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. हा संपूर्ण कार्यक्रम राज्यभरातील सर्व जिल्हा परिषद शाळांसाठी लाईव्ह दाखवून, जालिंदरनगरसारख्या शाळा राज्यभर उभारण्याच्या सूचना शिक्षणमंत्र्यांनी दिल्या.यावेळी बोलताना दादा भुसे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांमधूनच आदर्श शिक्षण मिळत असल्याने, या वर्षापासून शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी करून केवळ आवश्यक अशा चार समित्यांची कामे दिली जातील. शिक्षकांचा कमाल वेळ अध्यापनात जावा, यासाठी ही तरतूद करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुरूजींना चप्पल घातली…
शिक्रापूर वाबळेवाडी शाळेतील लोकवर्गणीतील अपहाराच्या आरोपांनंतर दत्तात्रय वारे गुरुजींनी चप्पल घालणे बंद केले होते. मात्र, दादा भुसे यांनी भर कार्यक्रमात वारे गुरुजींना ज्यांनी शिकविले त्या झेंडे गुरुजींच्या हस्ते आणि त्यांचे वडील निवृत्त शिक्षक बबनराव वारे गुरुजींच्या उपस्थितीत चप्पल घातली.
पुन्हा चौथी व सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा..
शालेय शिक्षणात पाच वर्षांपूर्वी पूर्वीच्या इयत्ता चौथी व सातवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा बंद करून त्या इयत्ता पाचवी आठवीला सुरू केल्या होत्या. मात्र, यावर्षीपासून दोन्ही पध्दतीने परीक्षा होऊन पुढील वर्षीपासून पुन्हा पूर्वीसारख्या इयत्ता चौथी व सातवीसाठी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करीत असल्याची घोषणाही यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली.





