Dada Bhuse : शालार्थ घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा

मुंबई : नागपूरसह इतर काही जिल्ह्यांत अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नांवे 2012पासून यादीत समाविष्ट करुन त्यांचे वेतन व भत्ते आदिंचा कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एसाआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात केली.
शिक्षण विभागातील दिवंगत अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षरीने 2700 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली.ह्या शैक्षणिक घोटाळ्याची व्याप्ती राज्यव्यापी आहे. दोषींवर वरीष्ठ अधिकारी यांची एसाआयटी नेमून चौकशी करा अशी मागणी सदस्यांनी केली. उत्तर देताना भुसे म्हणाले,यासंदर्भात एक एसाआयटी चौकशी सुरू आहे.आतापर्यंत 19 जणांना अटक झाली आहे.त्यामध्ये शिक्षणविभागातील अधिकारी तसेच संस्थाचालकही आहेत.
सदस्य प्रशांत बंब यांनी या शैक्षणिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी कायद्यात दुरुस्ती करा अशी आग्रही मागणी केली. तर,मालेगावचे सदस्य मुफ्ती यांनी 2009पासून2025 पर्यंत ही बोगस शिक्षकभरती सुरू आहे या सर्व दोषींना ताब्यात घ्या,बोगस व्यवहारातून शासनाची फसवणूक झालेली कोट्यवधींची रक्कम वसूल करा अशी मागणी केली. उत्तरात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कितीही मोठी व्यक्ती असली तरी गय केली जाणार नाही एसाआयटी चौकशीत सर्व उघड होईल अशी ग्वाही दिली.





