UP: विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं ‘गिफ्ट’

लखनऊ – उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील योगी सरकारने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्क्यांवर करण्यात आला आहे म्हणजेच 3 टक्क्यांनी वाढवला आहे.
उत्तर प्रदेशातील सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहे. थकबाकीची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केली जाईल. ज्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजनेत खाते आहे त्यांच्या NPS खात्यात थकबाकीची रक्कम जमा केली जाईल. या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची थकबाकी बँक खात्यात भरण्यात येणार आहे, असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकार लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्ष 2022 मध्ये एक मोठी भेट देणार आहे. जानेवारी महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 8 महिन्यांपासून थकबाकी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते, मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढू शकतो. 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. याशिवाय फिटमेंट फॅक्टरबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा अर्थसंकल्पीय खर्चात समावेश केला जाईल.
केंद्र आणि राज्य कर्मचार्यांनी त्यांच्या फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर सरकार विचार करू शकते, असे सांगण्यात येत आहे. तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये करण्याची घोषणा केली जाऊ शकते.
जर मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढले, तर महागाई भत्ताही वाढेल. महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 31 टक्के इतका आहे. DA ची गणना मूळ वेतनाने DA दराने गुणाकार करून केली जाते. म्हणजेच मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता आपोआप वाढेल. सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रातील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.





