D Mart Girl Suicide – चिंचवड स्टेशन येथील डी मार्टमध्ये काम करणा-या एका २१ वर्षीय तरुणीने विष प्राशन केले. उपचारादरम्यान रविवारी (दि. ५) रात्री तिचा मृत्यू झाला. आकांक्षा चंद्रकांत डोलारे (वय २१, रा. आनंदनगर, चिंचवड स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ३) रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तिने कामावर असताना विष प्राशन केले. मात्र तिने याबाबत कोणालाही सांगितले नाही. चार-पाच दिवसांपासून तिला जुलाब, उलट्या आणि अशक्तपणाचा त्रास होत असल्याचे सांगत दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी (दि. ४) रोजी तिला महापालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान तिच्या नातेवाईकांनी आकांक्षा हिचे एका मुलावर प्रेम होते. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी ती आग्रही होती. मात्र कुटुंबियांनी तिच्या या प्रस्तावाला विरोध केल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेतला. याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.