झेलेन्स्कीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी ट्रम्प यांची तू-तू मैं-मैं ; नेमकं काय घडलं व्हाईट हाऊसमध्ये वाचा सविस्तर ?

Cyril Ramaphosa-Donald Trump। अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या वादाप्रमाणेच दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये जोरदार वादविवाद झाला असल्याचे समोर आले आहे.
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा १९ मे रोजी वॉशिंग्टनला पोहोचले. त्यांच्या भेटीचा उद्देश आफ्रिका आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये नवसंजीवनी आणणे हे होते. पण व्हाईट हाऊसमधील या बैठकीदरम्यान, ट्रम्प यांनी अचानक वंशवादाच्या मुद्द्यावर रामाफोसा यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली.
ट्रम्प यांच्याकडून दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोप Cyril Ramaphosa-Donald Trump।
ट्रम्प यांनी सिरिल रामाफोसा यांच्यावर आरोप करत, त्यांच्या कार्यकाळात दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या शेतकऱ्यांची कत्तल होत आहे आणि तुम्ही बघ्याची भूमिका घेत आहात.” असे म्हटले. तर रामाफोसा यांनी हा आरोप नाकारण्यास सुरुवात करताच. ट्रम्प यांनी मोठ्या स्क्रीनवर एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की दक्षिण आफ्रिकेत हजारो गोरे शेतकरी मारले गेले आहेत. तसेच यावेळी ट्रम्प यांनी सिरिल रामाफोसा यांना माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या काही लेखांच्या प्रतीही दाखवल्या, ज्यात आफ्रिकेतील पांढऱ्या शेतकऱ्यांच्या नरसंहाराचे दावे करण्यात आले आहेत. रामाफोसा यांना ही प्रत दाखवताना ट्रम्प यांनी मृत्यू..मृत्यू ..असे जोरात ओरडले. यामुळे वातावरण खूप तणावपूर्ण झाले.
View this post on Instagram
रामाफोसा ट्रम्प यांना नेल्सन मंडेला यांची आठवण करून दिली Cyril Ramaphosa-Donald Trump।
ट्रम्प यांचे हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावताना सिरिल रामाफोसा यांनी, “आफ्रिकेत हिंसाचार वाढला आहे आणि सर्व जाती आणि वर्ग त्याच्याशी झुंजत आहेत. या हिंसाचारात मारले जाणारे लोक केवळ गोरे नाहीत तर काळे देखील मारले जात आहेत. गोऱ्या लोकांपेक्षा जास्त काळे लोक मारले गेले आहेत.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
रामाफोसा म्हणाले की, “मी हा व्हिडिओ यापूर्वी कधीही पाहिला नाही. व्हिडिओ कुठला आहे याची सत्यता आपण शोधू. आपल्या देशात गुन्हेगारी आहे आणि त्याचा परिणाम सर्वांना होतो, मग तो गोरा असो वा काळा. माझ्या अमेरिकेच्या भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधील संबंध सुधारणे हा होता, जे १९९४ च्या वर्णभेदाच्या काळापासून सर्वात खालच्या पातळीवर आहेत.”
यादरम्यान, रामाफोसा यांनी कतार सरकारने ट्रम्प यांना भेट दिलेल्या शाही विमानावरही टीका केली. ते म्हणाले की, “आमचे सरकार दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मला वाईट वाटते की माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी महागडे विमान नाही, ज्यावर ट्रम्प यांनी, “तुम्ही ते केले असते तर बरे झाले असते.”अशी खोचक टीका केली. ट्रम्प यांच्या कतार भेटीदरम्यान, कतार सरकारने अमेरिकेला ३४०० कोटी रुपयांचे एक आलिशान विमान भेट दिले होते.
फेब्रुवारी महिन्यातच ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेला मिळणारी मदत थांबवण्याची घोषणा केली होती, ज्याचे कारण त्यांनी तेथील गोऱ्या लोकांवरील कथित दडपशाही आणि जमीन अधिग्रहण धोरणे असल्याचे सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना रामाफोसा यांनी ट्रम्प यांना दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये अशी विनंती केली होती.
यावर्षी २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर, व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी दुसऱ्यांदा एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी वादविवाद केला. यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी युक्रेन युद्धावरून व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी जोरदार वादविवाद केला होता.





