Remal cyclone Updates : रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशात सतर्कता

Remal cyclone Updates – रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशात सतर्कता बाळगण्यात आली आहे. सेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून या सर्वांच्या तात्पुरत्या आश्रयासाठी ४ हजार छावण्या उबारण्यात आल्या आहेत.
रेमल हे चक्रीवादळ आज मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेशच्या किनारपट्टीवर थडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून वादळाच्या प्रभावामुळे सातखीरा आणि कॉक्स बाजार या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सुरक्षिततेसाठी बांगलादेश हवामान विभागाकडून मध्यरात्रीच्या सुमारास १० क्रमांकाचा हिरवा संकेत दिला जाण्याचीही शक्यता आहे. आज यापूर्वतयारीची माहीती देण्यासाठी एक विशेष बुलेटीन प्रसारित करण्यात आले.
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पार्श्वभूमीवर चट्टोग्राम, कॉक्स बाजार, मोंग्ला आणि पायरा या सागरी बंदरांना स्थानिक सावधगिरीचा क्रमांक ३ संकेत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या मौसमातील बंगालच्या उपसागरातील या पहिल्या चक्रीवादळाला दिले गेलेले रेमल हे नाव अरबी असून याचा अर्थ वाळू असा आहे. जवळपास ४ हजार निवारा केंद्रे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तयार करण्यात आली असून,
त्यांना पुरेशा प्रमाणात कोरड्या अन्नाचा पुरवठा करण्यात आला आहे, असे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत राज्यमंत्री मोहिबुर रहमान यांनी ही माहिती दिली.
परिस्थिती हाताळण्यासाठी ८० हजार स्वयंसेवक सज्ज ठेवण्यात आले आहेत. चट्टोग्रामच्या डोंगराळ भागात ७ ते १० फूट उंच समुद्राच्या लाटा उसळू शकतात. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे सातखीरा आणि कॉक्स बाजारच्या काही भागांना रेमालचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे देखील रहमान यांनी म्हटले आहे.
हे वादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळामध्ये होणार आहे. बंगालादेशची हद्द ओलांडून पश्चिम बंगालमध्ये या वादळाचा प्रभाव आज रात्रीनंतर जाणवणार आहे,
त्यामुळे भारतीय हवामान विभागाने मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळावरील वाहतूक २१ तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे.





