प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर सायबर गुन्हेगारांसाठी साॅफ्ट टार्गेट झाले आहे. जादा परताव्याच्या आमिषाने नागरिक अगदी सहज रित्या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. १ जानेवारी पासून गेल्या ३१ ऑगस्ट दरम्यानच्या आठ महिन्यांत तब्बल १०६ कोटी ७१ लाख ६९४ रुपये नागरिकांच्या खिशातून भामट्यांनी लुबाडले आहेत. गुंतवणुकीचे आमिष, मोबाइल लिंकवर क्लिक, तसेच खोट्या अॅप्लिकेशन्समुळे सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे. सरासरी दररोज ५० ते ६० तक्रारी सायबर क्राइम पोर्टलवर नोंदवल्या जात आहेत. पोलिसांकडून काही प्रमाणात रक्कम परत मिळवण्यात आली असली तरी बहुसंख्य प्रकरणांमध्ये नागरिकांची बचत वाया जाते आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत मोठा नफा मिळेल, अशा आश्वासनाने नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सर्वाधिक आहेत. सेबीकडे नोंदणी नसलेल्या खोट्या संस्थांमार्फत सायबर गुन्हेगार स्वतःला वित्तीय कंपनीचे प्रतिनिधी म्हणून सादर करतात. लोकांच्या गुंतवणुकीवर खोटे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून नफ्याचे चित्र दाखवले जाते. त्यामुळे लोक आणखी पैसे गुंतवतात. मात्र प्रत्यक्षात ती रक्कम परत मिळत नाही. उलट, पैसे काढण्यासाठी आणखी शुल्क किंवा करांच्या नावाखाली रक्कम मागितली जाते. याशिवाय मोबाइलवर आलेल्या लिंकवर क्लिक केल्याने बँक खात्यावरील नियंत्रण गुन्हेगारांकडे जाते. त्याद्वारे एटीएम, क्रेडिट कार्ड वा नेटबँकिंगची माहिती चोरली जाते आणि खात्यातील संपूर्ण रक्कम उडवली जाते. मागील वर्षी ३६५ कोटींची फसवणूक.. मागील वर्षभरात शहरातील नागरिकांची तब्बल ३६५ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. दररोज सुमारे एक कोटींचा गंडा बसत होता. मात्र सायबर पोलिसांच्या आक्रमक कारवाईनंतर यावर्षी आठ महिन्यांत फसवणुकीची रक्कम घटून १०६ कोटींवर आली आहे. पोलिसांनी विविध राज्यांमधून सायबर टोळ्यांना पकडून १८१ आरोपींना अटक केली असून, सायबर पोलीस ठाण्यात ३६ गुन्ह्यांची नोंद केली आहे. याशिवाय १६ कोटी ५० लाख रुपये ब्लॉक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांची धडपड.. नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर आलेल्या प्रत्येक तक्रारीची तपासणी करून संबंधित बँक खात्यांवर तत्काळ कारवाई केली जाते. मात्र अनेकदा रक्कम काही क्षणातच दुसऱ्या खात्यात वळवली जाते किंवा क्रिप्टो करन्सीत बदलली जाते. तरीही सायबर पोलिसांच्या दक्षतेमुळे अनेक नागरिकांचे नुकसान टळले आहे. शेकडो तक्रारी..दोन-चार गुन्हे दाखल.. सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांकडे पाठवल्या जातात; मात्र काही ठिकाणी त्या नोंदवण्यात उदासीनता दिसून येत आहे. हिंजवडी, सांगवी व वाकड परिसरात सर्वाधिक फसवणूक होत असून, यंदा वाकड व हिंजवडीमधून सुमारे १३०० तक्रारी, सांगवीतून ९०० आणि चाकणमधून ६०० तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी केवळ दोन ते चारच गुन्हे नोंदवण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. “सायबर गुन्हेगार दररोज नवनवीन युक्त्या वापरत आहेत. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक व बँक खात्याची माहिती देऊ नये. शंका आल्यास तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.” – डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा