प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आठ ते पंचवीस टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 63 लाख 93 हजारांची फसवणूक करण्यात आली. या गुन्ह्यातील दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्यावरून एक कोटी 15 लाख रुपयांचा व्यवहार झाला असून त्याबाबत विविध राज्यातून 10 तक्रारी दाखल आहेत.प्रथमेश शिवाजी भोसे (वय 23, सध्या रा. लोहगाव, पुणे. मूळ रा. अहिल्यानगर), सचिन राधाकिसन मोरे (वय 34, रा. दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची 63 लाख 93 हजार पाचशे रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी संबंधित व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आठ ते 25 टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवले होते. त्यानंतर वेगवेगळ्या लिंक द्वारे शेअर खरेदी करण्यास सांगत त्यांची फसवणूक करण्यात आली. दरम्यान तक्रारदार व्यक्तीला त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर सात कोटी ५६ लाख ९१ हजार ४६० रुपये एवढा नफा जमा झाल्याचे दाखवण्यात आले.या गुन्ह्याचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी तक्रारदाराने पैसे पाठवलेल्या बँक खात्याची माहिती काढली. संबंधित बँक खाते मातोश्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरी या नावाने असून त्याची केवायसी प्रथमेश भुसे याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी प्रथमेश भुसे याला ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार सचिन मोरे याच्या सोबत मिळून केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सचिन मोरे याला देखील ताब्यात घेतले. आरोपींनी तक्रारदाराकडून पैसे घेतल्यानंतर ते बँकेतून रोख स्वरूपात काढून त्याची विल्हेवाट लावली आहे. आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यावर एक कोटी 15 लाख 85 हजार 789 रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्या बँक खात्यावर विविध राज्यातील एकूण दहा तक्रारी दाखल आहेत. सायबर पोलीस तपास करीत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार, पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोसले, विनायक म्हस्कर, हेमंत खरात, कृष्ण गवळी, श्रीकांत कबुले, अभिजीत उकिरडे, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, संतोष सपकाळ, दिपाली चव्हाण यांच्या पथकाने केली.