Cyber Crime : सायबर भामट्यांची नवी खेळी! भावनिक साद घालून बँक खातं केलं रिकामं; नक्की काय घडलं?
Cyber Crime : तातडीने पैसे पाठवण्याच्या गडबडीत शिक्षिकेने गमावली मोठी रक्कम; सायबर हेल्पलाईन १९३० कडे तक्रार.

Cyber Crime – सायबर फसवणुकीसाठी भामट्यांनी आता भावनिक कारणांचा आधार घेत सावजांना जाळ्यात ओढणे सुरू केले आहे, असाच एक प्रकार समोर आला असून शुक्रवार पेठेत राहणाऱ्या एका ५९ वर्षीय शिक्षिकेची दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, एका ५९ वर्षीय शिक्षीकेला घरी असताना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव रविंद्र असे सांगत ओळख असल्याचे भासवले, त्यानंतर माझी आई आयसीयूमध्ये असून तातडीने पैसे भरणे आवश्यक आहे, असे सांगून मदतीची विनंती केली.
फसवणूक करणाऱ्याने माझा मित्र तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करेल, ते तुम्ही मला पाठवा, त्यावेळी पिडीत शिक्षीकेने त्यास तुझ्या मित्राला डायरेक्ट तुझ्या अकाउंटला पैसे पाठविण्यास सांग, असे सांगितले. परंतु, भामट्याने वेगवेगळी कारणे सांगत विश्वास बसावा यासाठी त्याने पीडितेला मोबाइलवर पैसे जमा झाल्याचे खोटे मेसेज व स्क्रीनशॉट पाठवले.
तसेच, दुसऱ्या मोबाइल नंबरवरून वारंवार संपर्क साधून पैसे लवकर पाठवण्यास सांगितले. या बनावट मेसेजवर विश्वास ठेवून शिक्षिकेने दोन दिवसांत गुगल पे आणि यूपीआयद्वारे एकूण दोन लाख रुपये आरोपीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. मात्र, नंतर प्रत्यक्षात पैसे जमा झाले नसल्याचे लक्षात येताच फसवणूक झाल्याचे उघड झाले. यानंतर पीडितेने तत्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवली तसेच एनसीआरपी पोर्टलवरही ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांचा इशारा.. Cyber Crime

cyber Crime
अनोळखी व्यक्तींच्या अशा कॉलवर विश्वास ठेवू नका , खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा झालेत का ते बँकेत तपासा, संशयास्पद व्यवहार त्वरित १९३० वर कळवा, कोणालाही ऑनलाइन पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करा. भावनिक कारणांचा आधार घेत सायबर गुन्हेगार नागरिकांना गंडा घालत असल्याने, कोणतीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.





