प्रभात वृत्तसेवा पुणे – शेअर मार्केट, टास्क फ्रॉड, संशयास्पद लिंक, तसेच मनी लाँड्रिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून पुणेकरांची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. विविध पोलिस ठाण्यांत दाखल झालेल्या १३ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सायबर चोरांनी एकूण १ कोटी ६१ लाख ९८ हजार ९५२ रुपये उकळले.आंबेगाव बुद्रुकला ३५ वर्षीय महिलेला लिंक पाठवून सायबर चोरांनी ५ लाख ३९ हजार ८९७ रुपयांना गंडवले. हा प्रकार ७ ते ११ जुलै दरम्यान घडला असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांता गुन्हा दाखल आहे.वारजेमध्ये ४४ वर्षीय तक्रारदारास शेअर ट्रेडिंगमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरांनी १६ लाख २१ हजार उकळले. हा प्रकार १४ डिसेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२४ मध्ये घडला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. कोथरूडमधील ६६ वर्षीय ज्येष्ठालाही असेच परताव्याचे आमिष दाखवत ११ लाख ६७ हजार ५५८ रुपये लाटले. हा प्रकार २५ जुलै ते २८ ऑगस्ट दरम्यान घडला. कोथरूडच्या ५५ वर्षीय महिलेलाही मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवत, पोलीस, सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून १९ लाख ३० हजार रुपये उकळले. हा प्रकार २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे. आनंदनगर, सिंहगड रोड परिसरातील ३३ वर्षीय महिलेची वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ३ लाख ५० हजार ५४० रुपयांची फसवणूक झाली. हिंगणे, सिंहगड रोड येथील ४९ वर्षीय महिलेला शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ लाख ६५ हजार रुपयांना लुबाडले. धायरीतील २३ वर्षीय युवकाची हॉटेल रेटिंग व ट्रेडिंगच्या आमिषाने ३ लाख ४ हजार १०० रुपयांची फसवणूक झाली असून, नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. माधवनगर, धानोरीतील ३९ वर्षीय महिलेला स्टॉक ट्रेडिंगच्या नावाखाली २७ लाख ८० हजार ९५७ रुपयांना फसवले. हा प्रकार ११ एप्रिल ते ६ जून दरम्यान घडला.वानवडीतील ५७ वर्षीय इसमाची यूएसडीटी खरेदीच्या नावाखाली २७ लाख ८३ हजार ७४४ रुपयांची फसवणूक झाली. कोंढवा येथील ५५ वर्षीय व्यक्तीस टास्क पूर्ण केल्यास परतावा मिळेल, असे सांगून १० लाख ८६ हजार रुपये उकळले. लोहगाव येथील ४२ वर्षीय महिलेचीही याच प्रकारे ६ लाख ८ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाली.वाघोलीतील शिंदे वस्तीतील ३८ वर्षीय इसमाला लिंक पाठवून ५ लाख ६१ हजार २५६ रुपये उकळले. वडगाव शेरीतील ज्येष्ठाला गुंतवणुकीच्या नावाखाली १३ लाखांना फसवले. चंदननगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. वाढत्या सायबर फ्रॉडला बळी पडणारे वाढत असल्याने अनोळखी लिंक, गुंतवणुकीचे आमिष व ऑनलाईन टास्कच्या ऑफरपासून सावध राहवे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.