World Cup 2023 India vs Sri Lanka Match : आज विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 33 व्या सामन्यात श्रीलंकेविरूध्दच्या सामन्यात मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेत विश्वचषकात स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत विक्रमांचे इमले रचले आहे. शमीने 5 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 18 धावा देत 5 मोठ्या विकेट घेतल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग सातवा विजय मिळवला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात आठ विकेट गमावत 357 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 55 धावांवर गारद झाला. भारताने हा सामना 302 धावांनी जिंकला.
1. शमीने स्टार्कची केली बरोबरी…
एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शमीने तिसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. स्टार्कने एकदिवसीय विश्वचषकात तीन वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
2. अशी कामगिरी करणारा शमी हा जगातील दुसरा गोलंदाज
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये 4 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा शमी जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. शमीने न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या, तसेच इंग्लंडविरुद्ध चार विकेट घेतल्या होत्या. आज विश्वचषक 2023 च्या 33 व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्धही शमीने पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या. शमीपूर्वी केवळ वकार युनूसलाच ही कामगिरी करता आली.
#CWC23 #INDvSL : टीम इंडियाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; श्रीलंकेचा विक्रमी धावांनी केला पराभव …
3. झहीर आणि श्रीनाथचा मोडला विक्रम…
शमीने या विश्वचषकात दुसऱ्यांदा पाच विकेट घेतल्या. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्याकडे आता वर्ल्ड कपमध्ये 45 विकेट्स आहेत. त्याने झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकले. झहीर आणि श्रीनाथ यांनी 44-44 विकेट घेतल्या होत्या. शमीने अवघ्या 14 डावात 45 विकेट घेतल्या. झहीरने 23 डावांत 44 तर श्रीनाथने 33 डावांत 44 बळी घेतले होते.
विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज…
1) मोहम्मद शमी- 45 विकेट्स
2) जवागल श्रीनाथ- 44 विकेट्स
3) झहीर खान- 44 विकेट्स
4) जसप्रीत बुमराह- 33 विकेट्स
5) अनिल कुंबळे – 31 विकेट्स
4. हरभजन-श्रीनाथला टाकलं मागे..
मोहम्मद शमी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. शमीने या प्रकरणात जवागल श्रीनाथ आणि हरभजन सिंगला मागे टाकले आहे.
भारताकडून ODI मध्ये सर्वाधिक पाच विकेट्स
1) मोहम्मद शमी- 4
2) जवागल श्रीनाथ- 3
3) हरभजन सिंग- 3
या दोन्ही दिग्गज गोलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. यासोबतच शमीने चौथ्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.