#CWC23 INDvPAK : गिलचे पुनरागमन होणार? अश्विन-शार्दुल-शमीपैकी एकाला मिळेल संधी; जाणून घ्या..संभाव्य Playing 11

World Cup 2023 #INDvPAK Match Playing 11 Prediction : सध्याच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ शनिवारी (१४ ऑक्टोबर) पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या मैदानावरील स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. याआधी सलामीच्या लढतीत गतविजेत्या इंग्लंडचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता भारत आणि पाकिस्तानचे संघ एक लाखाहून अधिक प्रेक्षकांसमोर एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आपले इरादे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. रोहित शर्माच्या शानदार शतकामुळे संघाला मोठा विजय मिळाला. आता भारतीय संघाची नजर विजयाची हॅट्ट्रिक करण्याकडे आहे.
शनिवारी अहमदाबादमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला, तर पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातही न हारण्याचा सिलसिला कायम राहणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारताने आतापर्यंत सात वेळा पाकिस्तानचा सामना केला आहे आणि प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे.
गिलच्या खेळण्याबाबत साशंकता कायम..
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मासमोर योग्य प्लेइंग-11 निवडण्याचे आव्हान आहे. स्टार युवा सलामीवीर शुभमन गिल पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नाही. डेंग्यूमुळे तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांना मुकला होता. यावेळी शुभमन गिल याला प्लेटलेट्स कमी झाल्याने रुग्णालयात जावे लागले. आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तो चेन्नईहून अहमदाबादला पोहोचला. विशेष म्हणजे त्याने काही काळ फलंदाजीचा सरावही केला आहे.
गिलच्या खेळण्यावर अजूनही साशंकता आहे. अहमदाबादमधील त्याचा विक्रम पाहता रोहितला या सामन्यात गिलचा संघात समावेश करायला आवडेल. दुसरीकडे, तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर भारतीय संघ व्यवस्थापनाला कोणताही धोका पत्करायचा नाही. स्पर्धेत अजून बरेच सामने खेळायचे बाकी असून शुभमनची आणखी गरज भासेल. अशा स्थितीत कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या युवा सलामीवीराला पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच त्याचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करतील . गिल फिट नसेल तर इशान किशनला पुन्हा एकदा संधी मिळेल.
शार्दुल ठाकूर वगळणार…?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळलेला अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळाली नाही. त्याला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले. अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला. अश्विनला वगळण्यात आल्याने माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि माजी अष्टपैलू इरफान पठाण यांनाही आश्चर्य वाटले. शार्दुलने अफगाणिस्तानविरुद्ध सहा षटकांत 31 धावांत एक बळी घेतला. त्याचवेळी अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण 10 षटके टाकली होती. त्याने 34 धावांत एक विकेट घेतली. आता अश्विन संघात सामील होतो की शार्दुल कायम राहतो हे पाहायचे आहे.
सिराजच्या जागी शमीला संधी मिळेल का?
गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत मोहम्मद सिराज दुसऱ्या स्थानावर असला तरी या स्पर्धेत त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. तो बराच महागडा ठरल्याचे सिद्ध झाले आहे. सिराजने अफगाणिस्तानविरुद्ध नऊ षटकांत 76 धावा दिल्या होत्या. मोहम्मद शमीचा विश्वचषकातील उत्कृष्ट विक्रम लक्षात घेता त्याला प्लेइंग-11 मध्ये ठेवावे, असे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. तो आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघात असून त्याला येथे खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात शमीने या मैदानावर नऊ सामन्यांत 17 बळी घेतले होते.
पाकिस्तान Playing 11 मध्ये बदल करू इच्छित नाही…
पाकिस्तान संघाने गेल्या सामन्यातच मोठा बदल केला होता. त्याने अनुभवी सलामीवीर फखर जमानच्या जागी अब्दुल्ला शफिकला संधी दिली. शफिकने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. बाबर आझमच्या फॉर्ममुळे संघ चिंतेत आहे. त्याला दोन सामन्यांत केवळ 15 धावा करता आल्या आहेत. शाहीन आफ्रिदीलाही गोलंदाजीत फारसे काही करता आले नाही. भारताविरुद्धच्या या मोठ्या सामन्यात या दोन्ही अनुभवी खेळाडूंकडून चांगली कामगिरी होईल, अशी आशा संघाला असेल.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी/रविचंद्रन अश्विन.
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.





