पुणे | गैरप्रकार रोखण्यासाठी सीव्हीजीएल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी, तसेच निवडणुकीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सीव्हीजीएल हे मोबाईप ऍप विकसित केले आहे.
या ऍपद्वारे नागरिकांना निवडणुकीतील अपप्रवृत्तीची माहिती प्रशासनाला देणे सुलभ होणार आहे. दरम्यान, गैरप्रकाराची माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
विधानसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शकपणे व्हावी, तसेच निवडणुकीत कोणते अनधिकृत प्रकार होऊ नयेत. निवडणुकीत 100 टक्के आचारसंहितेचे पालन सर्व उमेदवारांनी करावे, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे.
निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती आयोगाला मिळावी, या हेतूने निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे.
आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दलची माहिती देण्यासाठी या ऍपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ काढून तो अपलोड करावा लागणार आहे. यासाठी मोबाइलमध्ये इंटरनेट सेवा आणि जीपीएस लोकेशन ही सुविधा असणे आवश्यक आहे.
या ऍप वरून आचारसंहिता भंगाची माहिती दिल्यास ती जिल्हा प्रशासनाकडे येईल. प्रशासनाकडून ही तक्रार संबधित विधानसभा मतदारसंघाकडे पाठवली जाईल.
त्यानंतर त्या मतदारसंघातील भरारी पथक संबधित घटनास्थळी जाऊन त्यावर कार्यवाही करणार आहे. अक्षांक्ष व रेखांशद्वारे प्रशासनाला लोकेशन समजणार आहे. त्यामुळे अधिकची माहिती तक्रारदाराला द्यावी लागणार नाही.
नागरिकांसाठी व्हीएचए ऍप
व्हीएचए या ऍपद्वारे मतदार आपले नाव मतदार यादीत शोधू शकतात. त्याचबरोबर मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतात. या ऍपद्वारे मतदान ओळखपत्र डाऊनलोड करून घेता येणार आहे.
केवायसी -ईसीआय या ऍपमध्ये निवडणुकीतील उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र, गुन्हे दाखल असतील, तर त्याची माहिती नागरिकांना मिळणार आहे.





