पन्नास हजाराची लाच मागणाऱ्यास कोठडी

कराड – कुणबी जातीचा दाखला काढून देण्यासाठी 50 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या येथील तहसील कार्यालयातील विक्रम वसंत शिवदास (वय 43, मूळ रा. मालखेड ता. कराड, सध्या रा. ढेबेवाडी फाटा, मलकापूर ता. कराड) या खासगी कर्मचाऱ्यास सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार कार्यालयातील संबंधितांना सांगून तक्रारदारांच्या भाचीचा कुणबी जातीचा
दाखला काढून देतो, असे सांगून विक्रम शिवदास याने स्वतःकरीता व संबंधित अधिकाऱ्यांकरीता 50 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. सोमवारी दि. 31 रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत विक्रम शिवदास याला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.





