Custard apple : सीताफळांचा हंगाम सुरू; लिलावात किलोला मिळाला 251 रुपये भाव

पुणे – गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. मंगळवारी (दि. २०) मार्केटयार्डात २१ किलो आवक झाली. घाऊक बाजारात लिलावात किलोस २५१ रुपये भाव मिळाला. पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील शेतकरी दादा काळे यांच्या शेतातून बाजार समितीचे व्यापारी संचालक गणेश घुले यांच्या जय शारदा गजानन या ४८८ क्रमांकाच्या गाळ्यावर ही आवक झाली. हा माल बाजारातील व्यापारी व पुरवठादार सुबोध नाना झेंडे यांनी लिलावात खरेदी केला. त्यावेळी आडतदार अतुल रायकर, काका कदम, किरण रायकर, शेखर जगताप, सीताराम वाडकर, माऊली आंबेकर आणि पांडरंग सुपेकर उपस्थित होते.
जानेवारी अखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहणार आहे. सीताफळाचे तीन बार असतात. त्यापैकी पहिल्या बारची ही आवक आहे. हळूहळू आवक वाढणार आहे. आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर नागरिक आवर्जून सीताफळांची वाट पाहत असतात. हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यासह अहिल्यानगर, सातारा जिल्ह्यातून आवक होत असते. सध्या दाखल झालेल्या सीताफळला घरगुती ग्राहकांकडून मागणी आहे. मात्र, अलीकडच्या काळात ज्युस विक्रेते, पल्पसह विविध प्रक्रीया उद्योगांकडून मागणी वाढली आहे. आवक वाढून भाव कमी झाल्यानंतर यांच्याकडून खरेदी करण्यात येईल. तर शेतकरी दादा काळे म्हणाले, यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने उत्पन्न चांगले होणार आहे. तीन्हीही बहारात चांगले उत्पन्न मिळणार आहे.
“सीताफळाचा हंगाम नेहमीच्या तुलनेत १५ दिवस आधीच सुरू झाला आहे. बाजारात दाखल फळाची प्रत चांगली आहे. काही दिवसात आवक वाढेल.” – गणेश घुले, व्यापारी सचांलक, पुणे बाजार समिती



